धक्कादायक!; आयएसआय एजंटच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये भारतीय संरक्षण दलातील 50 अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 09:29 AM2018-04-20T09:29:49+5:302018-04-20T09:29:49+5:30
हनीट्रॅप करुन संवेदनशील माहिती मिळवल्याचं उघड
हरियाणा: हनीट्रॅपच्या माध्यमातून हेरगिरी करणाऱ्या एका महिला आयएसआय एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या महिलेच्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये सुरक्षा दलातील जवळपास 50 जणांचा समावेश असल्याची माहिती तपासातून पुढे आल्यानं हरियाणाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. या 50 जणांमध्ये भारतीय लष्कर, नौदल, हवाई दलातील अधिकाऱ्यांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 'इंडिया टुडे'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे
आयएसआय एजंट अमृता अहलुवालियानं एका 22 वर्षीय भारतीय तरुणाला हनीट्रॅप केलं होतं. गौरव शर्मा असं या तरुणाचं नाव आहे. अमृतानं गौरवकडून भारतीय संरक्षण दलांशी संबंधित अतिशय संवेदनशील माहिती गोळा केली. शर्माला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली. अमृताच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये एक लेफ्टनंट जनरल, तीन कर्नल, तीन मेजर, एक कॅप्टन, एक कमांडर, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील एक प्रशिक्षणार्थी आणि जम्मू-काश्मीरमधील एका तुरुंग अधीक्षकाचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कर्तव्य बजावत आहेत.
अमृता अहलुवालियाच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये राजकारणी, उद्योजक, शिक्षक आणि हरियाणातील शासकीय अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. मात्र सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असल्यानं एकाही व्यक्तीचं नाव उघड करण्यात आलेलं नाही. अमृतानं तिच्या फेसबुक प्रोफाईलवर ती मूळची चंदिगढची असून सध्या नवी दिल्लीत वास्तव्यास असल्याची माहिती दिली आहे. तिच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये एकूण 145 जण असून त्यातील 15 जणांशी तिची नुकतीच मैत्री झाली आहे. मात्र यातील कितीजणांना हनीट्रॅप करण्यात आलं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अमृताला गौरव शर्माकडून भारतीय संरक्षण दलाबद्दल अतिशय संवेदनशील माहिती मिळाली आहे. गौरव एका निवृत्त लष्करी जवानाचा मुलगा आहे. गौरव अमृतासाठी हेर म्हणून काम करत होता. भारतीय लष्कराकडून घेण्यात आलेल्या 18 भरती प्रक्रियांच्यावेळी हेरगिरी केल्याची कबुली गौरवनं दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यानं चारवेळा भरती प्रक्रिया सुरु करताना फेसबुक लाईव्ह केलं. पाकिस्तानातील आयएसआयच्या हँडलर्ससाठी त्यानं हे लाईव्ह केलं होतं. यासाठी त्याला 10 लाख रुपयांचं आमिष देण्यात आलं होतं.