डॉ. आंबेडकर संग्रहालयाला पर्यटनस्थळाचा दर्जा, केंद्र सरकारच्या पत्रानंतर पर्यटन विभागाची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:05 AM2020-01-28T05:05:58+5:302020-01-28T05:10:02+5:30
अलीपूर रोडवरील दुमजली इमारतीत त्यांनी १९५६ मध्ये अखेरचा श्वास घेतला.
नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालेल्या निवासस्थानी राज्यघटनेची प्रतिकृती साकारून तयार केलेल्या संग्रहालयाचा दिल्लीतील पर्यटन स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
अलीपूर रोडवरील दुमजली इमारतीत त्यांनी १९५६ मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर ही इमारत दुर्लक्षितच होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २ डिसेंबर २००३ रोजी ही जागा राष्ट्राला समर्पित केली.
या घरात बाबासाहेबांची अनेक पुस्तके व साहित्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या जागेवर स्मारकाबरोबरच डॉ. आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय तयार करण्याचा निर्णय घेतला.
राज्यघटनेची प्रतिकृती व बौद्ध संस्कृतीचा समावेश असलेले हे संग्रहालय दोन एकरात असून त्यासाठी १०० कोटी खर्च केले आहेत. मोदी यांनी गेल्या वर्षी संग्रहालयाचे उद्घाटन केले.
केंद्राने दिल्ली सरकारला संग्रहालयाचे दिल्लीतील पर्यटनस्थळांत समावेश करण्याची विनंती केली. दिल्ली पर्यटन विभागाचे जनसंपर्क अधिकारी सुधीर सोबती यांनी ही माहिती दिली.
संग्रहालयाचे डेप्युटी क्युरेटर अधिकारी एस. व्ही. वानखेडे व कन्झर्व्हेटर सुधाकर शर्मा म्हणाले की, संग्रहालयाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.
संग्रहालयातील मुख्य आकर्षण
- संग्रहालयात डॉ. आंबेडकर यांची अनेक छायाचित्रे आहेत. पुस्तके, व्हायोलिन, खुर्ची, टेबल व इतर साहित्यही जतन केले आहे. डॉ. आंबेडकर बौद्ध धर्माकडे कसे आकर्षित झाले याचा प्रवासही इथे पाहायला मिळतो. सांची स्तुपासह बौद्ध संस्कृतीवरील निर्मितीमुळे हे संग्रहालय आकर्षक ठरले आहे.
जगभरातील पर्यटक इथे भेट देऊ शकतील. देशभरातील लोकांचा ओढा वाढला आहेच. संग्रहालयाला भेट दिल्यावर डॉ. आंबेडकरांचे जीवन सहजपणे समजून घेणे शक्य होईल.
- एस. व्ही. वानखेडे,
संग्रहालयाचे डेप्युटी क्युरेटर