'असे' राष्ट्रपती होणे नाही! कलाम साहेबांच्या स्वाक्षरीचा 'तो' चेक एमडींनी अजून जपलाय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 07:32 PM2021-07-27T19:32:25+5:302021-07-27T19:39:22+5:30
कलाम साहेबांची आज पुण्यतिथी; सर्वोच्च पदावर पोहोचूनही सर्वसामान्यांसोबतची नातं जपणारे राष्ट्रपती म्हणून कलाम देशवासीयांच्या आजही स्मरणात
कोईम्बतूर: दिवंगत राष्ट्रपती आणि मिसाईलमॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. २७ जुलै २०१५ रोजी कलाम यांचं निधन झालं. एका सर्वसामान्य गरीब घरातील मुलगा ते देशाचे राष्ट्रपती असा थक्क करणारा प्रवास कलाम यांनी केला. देशाच्या क्षेपणास्त्र सज्जतेत त्यांचं मोलाचं योगदान आहे. राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचल्यानंतरही कलाम यांचा साधेपणा कायम राहिला. देशातील कित्येकांपुढे त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आहेत. त्यातलाच एक किस्सा आहे मिक्सर खरेदीचा.
कोणाकडूनही भेटवस्तू स्वीकारायची नाही असा कलाम यांचा दंडक होता. २०१४ मध्ये कलाम यांना तमिळनाडूतील एका कार्यक्रमात बोलावण्यात आलं. इरोडे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला सौभाग्य वेट ग्राईंडर्सनं प्रायोजकत्व दिलं होतं. सौभाग्यचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. अदिकेसवन यांनी त्यावेळी घडलेला सांगितलेला एक किस्सा कलाम साहेब त्यांच्या तत्त्वांशी किती एकनिष्ठ होते याची साक्ष देतो.
सौभाग्यचे प्रायोजकत्व असलेल्या कार्यक्रमाला कलाम ऑगस्ट २०१४ रोजी उपस्थित राहिले. त्यांना सौभाग्यकडून मिक्सर ग्राईंडर भेट देण्यात आला. कलाम यांनी भेट स्वीकारण्यास नकार दिला. मात्र कुटुंबाला मिक्सरची गरज असल्यानं त्यांनी तो विकत घेण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी ४ हजार ८५० रुपयांचा चेक दिला. कलाम साहेबांकडून पैसे घ्यायचे नाहीत म्हणून अदिकेसवन यांनी तो चेक बँकेत जमाच केला नाही.
जवळपास महिना उलटूनही बँक खात्यातून पैसे वजा न झाल्यानं कलाम यांच्याकडून अदिकेसवन यांना चेकबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी कलाम यांना वस्तुस्थिती समजली. चेक बँकेत जमा करा , अन्यथा मिक्सर परत करतो, असा धमकीवजा इशाराच कलाम यांनी फोनवरून दिला.
कलाम यांची स्वाक्षरी असलेला चेक अदिकेसवन यांना बँकेत जमा करायचा नव्हता. पण चेक वठला नाही तर कलाम साहेब मिक्सर परत करतील ही भीती होती. अखेर अदिकेसवन यांनी त्या चेकची आणखी एक कॉपी काढली आणि मूळ चेक बँकेत जमा केला. चेक वठल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कलाम साहेबांच्या कार्यालयातून आभार मानणारा फोन आला. कलाम यांची स्वाक्षरी असलेला चेक अदिकेसवन यांनी फ्रेम करून ठेवला.