मी महिन्याला २.७५ लाखांचा कर भरतो, प्रत्येकानेच टॅक्स भरायला हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:34 AM2021-06-30T08:34:51+5:302021-06-30T08:35:23+5:30
७५० आसनक्षमतेचे सभागृह, वाचनालय, संशोधन केंद्र उभारणार
लखनौ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक केंद्राचे भूमिपूजन येथे मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती मंगळवारी लखनौमध्ये आले होते.
मागच्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाने सांस्कृतिक खात्याच्या डॉ. आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक केंद्राच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. हे स्मारक ऐशबाग इदगाहसमोर उभारण्यात येणार आहे. यात डॉ. आंबेडकर यांचा २५ फूटांचा पुतळा उभारला जाणार आहे. या स्मारकासाठी ४५ कोटींची खर्च अपेक्षित आहे.
मी महिन्याला २.७५ लाखांचा कर भरतो
या दौऱ्यात कानपूर येथे राष्ट्रपती कोविंद यांनी प्रत्येकाने कर भरणे गरजेचे आहे, हे सांगण्यासाठी स्वत:चेच उदाहरण दिले. एका समुदायासमोर बोलताना कोविंद म्हणाले की, जरी आपल्या देशात राष्ट्रपती सर्वाधिक वेतन घेत असले तरी तेही कर भरत असतात. मी महिन्याला २.७५ लाख रुपये इतका कर भरतो. पण लोक मात्र मला पाच लाखांचा पगार दिला जातो यावरच चर्चा करीत असतात.