डॉ. बाबासाहेबांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 04:56 PM2017-12-01T16:56:03+5:302017-12-01T16:57:06+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद (९०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात उपचार सुरू होते
लखनऊ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद (९०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात उपचार सुरू होते. प्रज्ञानंद यांच्यासह इतर सात बौद्ध भिक्खूंनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. दीक्षा देणाऱ्यांपैकी आता एकही जण हयात नाही. त्यांच्या निधनाने लाखो अनुयायी शोकसागरात बुडाले.
मधूमेह आणि उच्च रक्तदाबाने प्रज्ञानंद त्रस्त होते. वयोमानामुळे त्यांचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- प्रज्ञानंद यांची देखभाल करणारे भन्ते सुमन काय म्हणाले-
गुरू प्रज्ञानंद मागच्या दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळलेले होते. त्यांना श्वासात अडथळ्यासह मल्टिपल डिसीज होते. तीन दिवसांपासून प्रज्ञानंद यांनी अन्न घेतलेले नव्हते. यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांना नागपूरात दिली होती दीक्षा -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. 1950 ते 1956 दरम्यान त्यांच्यावर काही बौद्ध भिक्खूंचा प्रभाव पडला आणि त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये आपल्या पत्नीसह तसेच हजारो अनुयायांसह बौद्ध धम्माचा अंगीकार केला होता.
- 13 व्या वर्षी श्रीलंकेतून आले होते प्रज्ञानंद -
बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचा जन्म श्रीलंकेत झाला होता. 1942 मध्ये प्रज्ञानंद भारतात आले, त्यावेळी त्यांचे वय फक्त 13 वर्षे होते. प्रज्ञानंद लखनऊच्या रिसालदार पार्कमधील बुद्ध विहारात राहत होते. बाबासाहेबांनी या बुद्ध विहाराला दोन वेळा भेट दिली होती.