डॉ. आंबेडकरांना राष्ट्राचे अभिवादन
By admin | Published: April 15, 2016 04:10 AM2016-04-15T04:10:25+5:302016-04-15T04:10:25+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात गुरुवारी देशभर साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर हे आधुनिक
नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात गुरुवारी देशभर साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारतातील महान आदर्श आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
संसद भवन परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महू या बाबासाहेबांच्या जन्मस्थळी भेट देऊन महामानवाला आदरांजली अर्पण केली. महू येथे २००८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या भव्य स्मारकाला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, असे डॉ. आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू आर.एस. कुरील यांनी सांगितले. पंतप्रधानांसोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि अन्य नेते महू येथे उपस्थित झाले होते. मोदींनी तेथील भव्य स्मारकाचे दर्शन घेतले.
नवी दिल्लीतील संसद भवनात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या नेतृत्वात संसद सदस्यांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. संसद भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांच्या तैलचित्राला आदरांजली अर्पण करणाऱ्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, एम. वेंकय्या नायडू, थावरचंद गहलोद व काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा समावेश होता. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, नवी दिल्लीसह देशातील अनेक राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)
बाबासाहेब महान आदर्श-सोनिया गांधी
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बाबासाहेबांना आधुनिक भारताचे महान आदर्श संबोधून राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. ‘बाबासाहेबांचा लोकशाहीवर अढळ विश्वास होता. राज्यघटनेने आपल्याला केवळ राजकीय लोकशाहीच दिलेली नाही तर सामाजिक लोकशाहीदेखील दिली आहे आणि सर्वांसाठी समानतेची हमी तसेच दुर्बल व वंचित घटकांना सबलीकरणाची संधी दिली आहे. बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना ही मूलभूत मानव अधिकारांची हमी देणारी आहे,’ असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.