डॉ. मनमोहन सिंग यांना तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठविण्यास द्रमुकचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:17 AM2019-05-29T04:17:38+5:302019-05-29T04:17:57+5:30
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर निवडून आणण्यात काँग्रेससमोर खूपच अडचणी दिसत आहेत.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर निवडून आणण्यात काँग्रेससमोर खूपच अडचणी दिसत आहेत. डॉ. सिंग व काँग्रेसचेच सँटियस कुजुर यांची मुदत १४ जून रोजी संपत आहे. डॉ. सिंग यांना तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठवण्यास द्रमुकने नकार दिल्याचे समजते. तामिळनाडू व आसाममध्ये राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत.
तामिळनाडूमधून राज्यसभेसाठी निवडणूक होणार असून, त्यापैकी दोन जागांवर द्रमुकचे उमेदवार निवडून जाऊ शकतात. द्रमुकचे प्रमुख कणिमोळी या लोकसभेवर निवडून गेल्याने ती एक जागा रिकामी झाली आहे, तर दुसऱ्या जागेसाठी डी. राजा पुन्हा प्रयत्नशील असून, त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे दिसते.
कणिमोळी यांच्याऐवजी द्रमुकने डॉ. मनमोहन सिंग यांना उमेदवारी द्यावी, असे काँग्रेसचे प्रयत्न होते. पण टू-जी घोटाळा प्रकरण डॉ. सिंग यांनी नीट हाताळले नाही आणि त्यामुळे द्रमुकची बदनामी झाली, असे त्या पक्षाला वाटत आहे. टू-जी प्रकरण न्यायालयात बराच काळ चालले आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकांत आपला पराभव झाला, असे द्रमुक नेत्यांचे म्हणणे आहे. त्या साºयाला ते डॉ. सिंग यांनाच जबाबदार धरत आहेत. त्यामुळे त्यांनी माजी पंतप्रधानांना तामिळनाडूतून राज्यसभेवर पाठवण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येते.
>आसाममधूनही पाठवणे अशक्यच
गेल्या वेळी डॉ. मनमोहन सिंग आसाममधून राज्यसभेवर गेले होते. पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि आता आसाममध्ये काँग्रेसचे केवळ २५ आमदार आहेत. एआययूडीएफच्या १३ आमदारांचा पाठिंबा मिळाला तरी डॉ. सिंग यांना निवडून आणण्यास ती संख्या कमी आहे. भाजपचे ८८ आमदार आहेत. त्याआधारे भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यामुळे आसाममध्ये राज्यसभेसाठी एआययूडीएफला पाठिंबा देणे वा आपला उमेदवार उभाच न करणे, असे दोनच पर्याय आता काँग्रेसपुढे आहेत.