"तुम्ही आमची फी सीमेवरच भरले", 'या' डॉक्टरांचे सैनिकांशी अतुट नाते; 25 वर्षांपासून देतात मोफत उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 07:08 PM2023-01-27T19:08:16+5:302023-01-27T19:09:03+5:30
Doctor Brijpal Tyagi: सैन्यात भरती होऊ न शकलेल्या डॉक्टरांनी सैनिकांवर मोफत उपचार करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
गाझियाबाद : देशप्रेमाची भावना आणि सेवेची तळमळ हे दोन्ही गुण गाझियाबादच्या डॉ. ब्रिजपाल त्यागी यांच्यामध्ये आहेत. त्यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांना लहानपणापासूनच सैनिकांच्या वर्दीचे आकर्षण होते. खरं तर देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि निवडही झाली. पण 1989 मध्ये त्यांची परिस्थिती अशी बनली की ते सैन्यात भरती होऊ शकले नाहीत. पुढे घरच्यांच्या दबावामुळे ते डॉक्टर झाले. मात्र, डॉक्टर झाल्यानंतरही त्यांनी सैनिकांप्रती जिव्हाळ्याचे नाते ठेवले आहे. लक्षणीय बाब म्हणजे ते मागील 25 वर्षांपासून सैनिकांवर मोफत उपचार करत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी आपला झेंडा रोवला आहे. या क्षेत्रात त्यांना येऊन जवळपास 26 वर्षे उलटली आहेत. या वर्षांत डॉ.ब्रिजपाल यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले. नॉनस्टॉप शेकडो कानांवर मोफत ऑपरेशन करून त्यांनी 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये आपले नाव नोंदवले आहे. एवढेच नाही तर वैद्यकीय सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ.बी.पी.त्यागी यांना ब्रिटिश संसद-हाऊस ऑफ कॉमन्समध्येही सन्मानित करण्यात आले आहे. 2017 मध्ये त्यांना टाइम्स अचिव्हर्स अवॉर्ड देखील मिळाला होता.
सैनिकांची सेवा करण्याचा ध्यास
गाझियाबादमधील आरडीसी येथील डॉ. बीपी त्यागी यांच्या क्लिनिकच्या बाहेरील गेटवर एक नोटीस लावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये सैनिकांवर मोफत उपचार केले जातील असे म्हटले आहे. "तुम्ही आमची फी सीमेवरच भरली आहे, आता तुम्हाला कोणतीही फी भरण्याची गरज नाही," असे या नोटीसमध्ये लिहण्यात आले आहे. त्यांनी जवानांप्रती असलेल्या प्रेमामुळे ही मोहिम राबवली आहे. डॉ.बी.पी.त्यागी हे देशातील सैनिकांवर मोफत उपचार करतात. असे केल्याने एक समाधान मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनेक जवानांनीही त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. बीपी त्यागी म्हणतात की मी सैन्यात भरती होऊ शकलो नाही. पण मला वैद्यकीय क्षेत्रातूनच या सैनिकांशी जवळीक साधायची आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"