डॉ. कलाम यांच्या पार्थिवावर ३० जुलैरोजी अंत्यसंस्कार
By admin | Published: July 28, 2015 09:50 AM2015-07-28T09:50:53+5:302015-07-28T16:31:19+5:30
भारताचे मिसाईल मॅन व माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे पार्थिव दिल्लीत दाखल झाले असून त्यांच्या पार्थिवावर ३० जुलैरोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - भारताचे मिसाईल मॅन व माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल झाले असून यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास डॉ. कलाम यांचे पार्थिव घेऊन येणारे वायुदलाचे विशेष विमान पालम विमानतळावर पोहोचले. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी कलाम यांना पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांनी डॉ. कलाम यांना मानवंदना दिली.
सोमवारी सायंकाळी शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एका कार्यक्रमात व्याख्यान देत असताना ८४ वर्षीय कलाम ६.३० च्या दरम्यान अचानक घेरी येऊन कोसळले. त्यांना लगेच नानग्रिम हिल्स येथील बेथनी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
आज सकाळी कलाम यांचे पार्थिव शिलाँगहून गुवाहाटी येथे आणण्यात आले. तेथे आसामाचे मुख्यमंत्री तरूम गोगोई यांनी पुष्पचक्र अर्पण करून कलाम यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव विशेष विमानाने राजधानी दिल्लीत नेण्यात आले. तेव्हा प्रोटोकॉल मोडून राष्ट्रपती व पंतप्रधान विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर डॉ. कलाम यांचे पार्थिव १०, राजाजी मार्ग या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. कलाम यांच्या पार्थिवावर ३० जुलैरोजी सकाळी ११ वाजता रामेश्वरम येथील त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली.
कलाम यांच्या निधनानंतर शासनातर्फे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र कोणतीही सुट्टी जाहीर झालेली नसून सर्व शाळा, कॉलेजेस व सरकारी कार्यालये सुरू राहणार असल्याचे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
संसदेत माजी राष्ट्रपतींना वाहिली श्रद्धांजली...
दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहात आज डॉ. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कलाम यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली तर राज्यसभेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर लोकसभेचे कामकाज दोन दिवसांसाठी व राज्यसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.