कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरणा होते डॉ. कलाम - बराक ओबामा
By admin | Published: July 29, 2015 10:26 AM2015-07-29T10:26:52+5:302015-07-29T11:15:45+5:30
डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरण स्त्रोत होते असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी डॉ. कलाम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २९ - ' डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम हे कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरण स्त्रोत होते' असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मिसाईल मॅन व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
भारताला बलशाली महासत्ता होण्याचे स्वप्न दाखविणारे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे सोमवारी शिलाँग येथे निधन झाले. कलाम हे सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एका कार्यक्रमात व्याख्यान देत असताना अचानक घेरी येऊन कोसळले. त्यांना लगेच नानग्रिम हिल्स येथील बेथनी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. कलाम यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली असून जगभरातूनही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही शोक संदेश देत डॉ. कलाम यांना आदरांजली वाहिली. ' भारताचे माजी राष्ट्रपती असलेले डॉ. कलाम यांच्या निधनाबद्दल मी अमेरिकन जनता व माझ्याकडून दु:ख व्यक्त करतो. शास्त्रज्ञ व राजकारणी असलेले कलाम हे सामान्य परिस्थितीतून पुढे येऊन देशातील प्रमुख व्यक्ती बनले होते. त्यांनी भारतासह परदेशातही प्रतिष्ठा मिळवली. १९६२ साली अमेरिकेच्या दौ-यावर आलेल्या कलाम यांनी 'नासा'सोबत संबंध जोडून आमच्या अंतराळ कार्यक्रमाला चालना दिली. लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख असलेले कलाम विनम्रता व जनसेवेसाठी त्यांची असलेली निष्ठा यामुळे भारतातील कोट्यावधी नागरिकांच्या प्रेरणेचे स्त्रोत ठरले' असे ओबामांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले.