डॉ. सिंग यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता नेहमीच उठून दिसत असे; PM मोदींकडून शोक व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 23:27 IST2024-12-26T23:23:29+5:302024-12-26T23:27:10+5:30

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. 

Dr manmohan Singh death His wisdom and humility were always visible PM narendra Modi expresses condolences | डॉ. सिंग यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता नेहमीच उठून दिसत असे; PM मोदींकडून शोक व्यक्त

डॉ. सिंग यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता नेहमीच उठून दिसत असे; PM मोदींकडून शोक व्यक्त

Dr Manmohan Singh Death: देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ९२ वर्षीय मनमोहन सिंग यांच्या फुफुसात संसर्ग झाला होता. त्यांना एम्सच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांची चौकशी केली. तसंच डॉ. सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्यासोबतच्या आठवणींनाही पंतप्रधान मोदी यांनी उजाळा दिला आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीचा उल्लेख करत नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, "भारताने आज आपला एक सर्वांत प्रतिष्ठित नेता गमावला. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. मनमोहन सिंगजी यांनी एक नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती मिळवली. त्यांनी सरकारमध्ये अर्थमंत्रिपदासह विविध पदांची जबाबदारी सांभाळली आणि आपल्या आर्थिक धोरणांवर ठसा उमटवला. त्यांचा संसदेतील वावर आणि कामकाज अभ्यासपूर्ण होते. पंतप्रधानपदी असताना त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले," असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

"डॉ. मनमोहन सिंगजी हे पंतप्रधान असताना आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आम्ही सतत संवाद साधत असायचो. शासनाशी संबंधित विविध विषयांवर आमच्यात विस्तृत चर्चा व्हायची. त्यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता नेहमीच उठून दिसत असे," अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी डॉ. सिंग यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. 


 
दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही बेळगाव येथील काँग्रेस कार्यकारिणीचे सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना झाले आहेत.  

Web Title: Dr manmohan Singh death His wisdom and humility were always visible PM narendra Modi expresses condolences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.