विरोध झाला, पण ते ठाम राहिले; आधार कार्डच्या निर्मितीत डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 00:53 IST2024-12-27T00:52:58+5:302024-12-27T00:53:54+5:30

आधार कार्ड योजनेविषयी संशय घेणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. त्यावेळचा विरोधी पक्ष आधार कार्डाविषयी आक्रमक होता.

Dr Manmohan Singhs contribution in the creation of Aadhaar card in india | विरोध झाला, पण ते ठाम राहिले; आधार कार्डच्या निर्मितीत डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान

विरोध झाला, पण ते ठाम राहिले; आधार कार्डच्या निर्मितीत डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान

Dr Manmohan Singh Death: भारताचे माजी पंतप्रधानडॉ. मनमोहन सिंग हे गुरुवारी रात्री कालवश झाले. प्रख्यात अर्थतज्ज्ञ असणाऱ्या डॉ. सिंग यांनी पंतप्रधानपदी असताना विविध योजना राबवत देशाच्या विकासात भरीव योगदान दिले. खूपच पुढचा विचार दाखवणारी एक योजना डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला दिली आणि ती म्हणजे आधार कार्ड.

संयुक्त राष्ट्रांनी आधार कार्ड योजनेची पुष्कळ प्रशंसा केली; परंतु कमालीची गोष्ट अशी की आधार कार्ड योजनेविषयी संशय घेणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. त्यावेळचा विरोधी पक्ष आधार कार्डाविषयी आक्रमक होता. ‘हे कार्ड तयार करण्यासाठी सरकार लोकांकडून माहिती घेईल; पण त्याचा दुरुपयोग झाला तर काय?’- असा प्रश्न लोकांच्या मनात पेरला गेला. पण त्याविषयीच्या शंका-कुशंका निराधार ठरल्या. आज आधार कार्ड सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. पॅन कार्ड असो, मोबाइल नंबर की बँकेचे खाते; सगळीकडे आधार कार्ड अनिवार्य आहे. आपण ज्या वेगाने डिजिटलायझेशनच्या दिशेने जात आहोत, त्यात आधार कार्डाचे खूप मोठे योगदान आहे.  

भारताला जगाच्या पातळीवर सशक्त कसे करावे, याबाबतीत त्यांचा दृष्टिकोन नेहमीच स्पष्ट राहिला. भारतीय रिझर्व्ह  बॅंकेचे गव्हर्नर आणि कुशल अर्थशास्त्री म्हणून मनमोहन सिंग यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्यातील अद्वितीय प्रतिभा पी. व्ही. नरसिंह राव यांनी ओळखली. राव यांच्या सरकारमध्ये  १९९१ ते १९९६ या काळात डॉ. सिंग अर्थमंत्री होते. याच काळात भारताने जागतिकीकरणाच्या दिशेने पावले टाकली. भारतातले बदनाम लायसन्स आणि परमिटराज त्यांनी संपविले. त्यानंतर भारताच्या बुडत्या अर्थव्यवस्थेने हातपाय हलवायला सुरुवात केली. अख्ख्या जगाने त्याचे कौतुक केले.

वर्तमानकालीन आणि येऊ घातलेल्या प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन उपाय शोधायचा डॉ. मनमोहन सिंग यांचा प्रयत्न असे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारताचा अमेरिकेशी झालेला अणुविषयक करार हा आपल्या देशाच्या इतिहासातला एक मैलाचा दगड आहे. त्यांनी स्वतः या कराराला ‘आपली सर्वांत मोठी उपलब्धी’ म्हटले होते. भारताला परमाणू इंधन खरेदी करता येणे, तसेच परमाणू संयंत्रांसाठी इंधन तंत्रज्ञान हस्तगत करणे या करारामुळे शक्य झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी तत्कालीन अमेरिकी राष्ट्रपती जॉर्ज बुश यांना मोठी आस्था होती. डॉ. मनमोहन सिंग या नेक माणसाची इमानदारी नेहमीच निर्विवाद राहिली आणि राहील! 
 

Web Title: Dr Manmohan Singhs contribution in the creation of Aadhaar card in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.