डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान अमूल्य; नरेंद्र माेदी यांचे गाैरवाेद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 08:10 AM2024-02-09T08:10:30+5:302024-02-09T08:10:57+5:30
एक खासदार आपल्या दायित्वासाठी किती जागरूक असतो याचे डॉ. सिंग प्रेरक उदाहरण आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एक खासदार आपल्या जबाबदारीविषयी किती जागरूक असतो याचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग प्रेरक उदाहरण आहेत. जेव्हा जेव्हा देशातील लोकशाहीची आणि महत्त्वाच्या नेत्यांची चर्चा होईल, तेव्हा डॉ. सिंग यांच्या योगदानाची चर्चा निश्चितपणे होईल, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत डॉ. सिंग यांच्यासह निवृत्त होत असलेल्या सदस्यांना निरोप देताना काढले.
एक खासदार आपल्या दायित्वासाठी किती जागरूक असतो याचे डॉ. सिंग प्रेरक उदाहरण आहेत. डॉ. सिंग या सभागृहाचे सहावेळा सदस्य राहिले.
काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी पक्षाचा विजय होणार हे ठाऊक असूनही डॉ. सिंग सभागृहात मतदान करण्यासाठी व्हिलचेअरवर आले. संसदीय समिती सदस्यांच्या निवडणुकीतही त्यांनी व्हिलचेअरवर येऊन मतदान केले. ते कोणा व्यक्तीला नव्हे तर लोकशाहीला ताकद देण्यासाठी आले होते.
राज्यसभेत डिसेंबर २०२३ मध्ये निवृत्त झालेल्या १०, तसेच एप्रिल ते जुलैदरम्यान निवृत्त होणाऱ्या ५८ सदस्यांसह एकूण ६८ सदस्यांना आज निरोप देण्यात आला.
मनमोहन सिंग यांनी
मार्गदर्शन करावे
nडॉ. सिंग यांनी सदैव प्रेरणा
देऊन मार्गदर्शन करावे यासाठी पंतप्रधानांनी त्यांना दीर्घायुष्यासाठी
शुभेच्छा दिल्या.
nदर दोन वर्षांनी राज्यसभेतील खासदारांना निरोप देण्याचा प्रसंग येतो. निरतंरतेचे प्रतीक हे सभागृह दर दोन वर्षांनी नवी प्राणशक्ती, ऊर्जा, उत्साह प्राप्त करते, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.
या मंत्र्यांना निरोप
निरोप दिलेल्या सदस्यांमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, पुरुषोत्तम रुपाला, राजीव चंद्रशेखर, व्ही. मुरलीधरन या आठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.