डॉ. मनमोहनसिंगांच्या माजी सल्लागाराने मागवली ऑनलाईन दारू, आरोपीने घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 10:07 AM2020-06-29T10:07:35+5:302020-06-29T10:10:04+5:30
बारु यांनी ऑनलाईन सर्च केलेल्या दुकानाचे नाव La Cave Wines & Spirits असे होते.
नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सल्लागार आणि द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक संजय बारू यांना ऑनलाईन दारु खरेदीत फसविण्यात आले आहे. ऑनलाईन दारु विकण्याच्या नावाखाली आरोपींनी बारु यांना 24 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून तो कॅब ड्रायव्हर असल्याचे समजते. बारु यांनी दारु खरेदीसाठी ऑनलाईन दुकान सर्च केले होते.
बारु यांनी ऑनलाईन सर्च केलेल्या दुकानाचे नाव La Cave Wines & Spirits असे होते. त्यानंतर, बारु यांनी या शॉपचा नंबर डायल केल्यानंतर तेथील दुकानदाराने बारु यांच्याशी संवाद साधला. बोलणी झाल्यानंतर बारु यांनी ऑनलाईन 24 हजार रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र, पेमेंट केल्यानंतर तो नंबर स्वीच ऑफ झाला. आता, आपली फसवणूक झाल्याचं संजय बारू यांना कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीने आपण केलेल्या फसवणुकीची कबुली देताना सांगितले की, तो व त्याचा मित्र मिळून बनावट नावाने सीमकार्ड खरेदी करतात. त्यानंतर, या नंबरद्वारे कॉल करुन लोकांची फसवणूक करतात. विविध राज्यांमध्ये आपले बँक खाते असून कुण्या ग्राहकाने अकाऊंटमध्ये पैसे टाकल्यानंतर, तात्काळ ते पैसे दुसऱ्या राज्यातील खात्यामध्ये डायव्हर्ट केले जातात. तेथून ते पैसे संबंधित आरोपीच्या खात्यात जमा होतात.