गरिबांना मोफत सेवा देणाऱ्या पद्मश्री डॉ. अग्रवाल यांचं कोरोनानं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 09:01 AM2021-05-18T09:01:05+5:302021-05-18T09:02:24+5:30
कोरोनाच्या संकटात देशाने अनेक दिग्गजांना गमावलं आहे. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत आप्तजनांना आणि जवळच्या प्रिय व्यक्तांना अनेकांनी गमावलय.
मुंबई - इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि हर्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. के.के. अग्रवाल यांचे सोमवारी रात्री 11.30 वाजता निधन झाले. अग्रवाल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समधील ट्रामा सेंटर येथे उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
कोरोनाच्या संकटात देशाने अनेक दिग्गजांना गमावलं आहे. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत आप्तजनांना आणि जवळच्या प्रिय व्यक्तांना अनेकांनी गमावलय. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे दिग्गज नेते आणि खासदार राजीव सातव यांचे निधन झाले. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांचे निधन झाले. आता, डॉ. के.के अग्रवाल यांचीही कोरोनाविरुद्धची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. अग्रवाल यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनच यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
— Dr K K Aggarwal (@DrKKAggarwal) May 17, 2021
विशेष म्हणजे अग्रवाल यांनी दोन महिन्यांपूर्वीच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. पण, गेल्याच महिन्यात त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली. सन 2010 मध्ये अग्रवाल यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. अग्रवाल आपल्या व्यवसायाने प्रसिद्ध होतेच, पण गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा देणे आणि दिलदारपणामुळेही ते लोकांचे आवडते होते. कोरोना काळातही डॉक्टरांच्या पाठिशी ते खंबीरपणे उभे राहिले. पण, याच कोरोनाच्या संक्रमणामुळे त्यांचे निधन झाले.