काल्पनिक आजारांसाठी ‘डॉ. गुगल’कडे रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 01:20 AM2021-03-12T01:20:26+5:302021-03-12T01:20:57+5:30
ब्रिटनमध्ये लहान मुलांचे डॉक्टर तर जास्त त्रस्त झाले आहेत. कारण अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन त्यांच्याकडे येतात,
तुम्हाला कुठलाही आजार झाला की तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे जाता? कोणाकडून उपचार घेता? त्यातल्या तज्ज्ञाला दाखवता, आपल्या फॅमिली डॉक्टरला आधी दाखवता, बुवा-बाबाकडून जडी-बुटी घेता? की अंगावरच काढता?
- डॉक्टर हा कोणत्याही समाजातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण, कोरोना काळानं सगळी चक्रंच उलटी फिरवून टाकली आहेत. आताही लोक डॉक्टरकडे जातात; पण, ‘डॉ. गुगल’कडे! काहीही होऊ द्या, (किंवा काहीही झालेलं नसू द्या), लगेच डॉ. गुगल किंवा विकिपेडियावर जाऊन सर्च करायचं! आपल्याला झालेल्या किंवा न झालेल्या आजाराबाबत माहिती मिळवायची आणि त्यानुसार थेट उपचार करायला सुरुवात करायची की तेवढी माहिती प्रत्यक्ष डॉक्टरांनाही नसावी. जगभरातच हा ट्रेंड आता वाढतो आहेे. आपल्याला काही आजार झाल्यावर किंवा आजाराची शंका आल्यावर अनेक जण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी गुगलून पाहातात. आपली लक्षणं नेटवरच्या माहितीशी ताडून पाहातात आणि आपल्याला हा आजार झालेलाच आहे असं स्वत:शी ठरवून टाकतात. काही महाभाग त्याच्या अजून पुढचे. ते थेट डॉक्टरांकडेच जातात आणि तपासणी होण्याआधीच त्यांना सांगतात, मला अमुक अमुक आजार झाला आहे. त्यावर उपचार करा! फूड ॲलर्जीपासून ते ब्रेन ट्यूमरपर्यंत कोणताही आजार यातून सुटलेला नाही आणि त्या प्रत्येक विषयांत जणू पीएच.डी. असल्यासारखे लोक वागू लागले आहेत.ब्रिटनमध्ये तर हा कल खूपच वाढला आहे. ज्यांना काहीही झालेलं नाही, असे धडधाकट लोकही डॉक्टरांकडे जाऊन मला अमुक एक आजार झाला आहे, असं सांगतात. अशा काल्पनिक आजारांनी ब्रिटनमधील नागरिक आता त्रासले आहेत. डॉक्टरही या प्रकारानं हैराण झाले आहेत. यावर काय करावं, असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. कारण तुम्हाला काहीही झालेलं नाही, असं सांगूनही लोकांना पटत नाही. ‘डॉ. गुगल’ यांनी दिलेली माहिती लोक प्रत्यक्ष डॉक्टरांच्या तोंडावर फेकतात आणि म्हणतात, आता बोला! त्यामुळे लोकांचा डॉक्टरांवरचा भरोसाही उडत चालला आहे. या प्रकाराला नव्या वैद्यकीय परिभाषेत ‘सायबरकोंड्रिया’ असं म्हटलं जातं.
ब्रिटनमध्ये लहान मुलांचे डॉक्टर तर जास्त त्रस्त झाले आहेत. कारण अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन त्यांच्याकडे येतात, त्यांना कोणत्या आजारांची लक्षणं आहेत, ते सांगतात आणि त्या आजारांसाठी आमच्या मुलांवर उपचार करा, असा आग्रह धरतात. डॉक्टर मुलांना तपासतात, तर त्यांच्यात एकाही आजाराचं लक्षण दिसत नाही. तुमचा मुलगा एकदम हेल्दी आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं, तर पालकच डॉक्टरांना कनव्हिन्स करायचा प्रयत्न करतात, की जरा नीट पाहा, मुलामध्ये या आजाराची लक्षणं दिसताहेत.. तरीही डॉक्टरांनी नकार दिला, तर सरळ दुसरा डॉक्टर गाठतात.
डॉक्टरांच्या संघटनाही चिंताग्रस्त झाल्या आहेत. रॉयल कॉलेज ऑफ पीडियाट्रिक्स ॲण्ड चाइल्ड हेल्थ (आरसीपीसीएच) या संस्थेनं तर आता डॉक्टरांसाठीच दिशानिर्देश जारी केले आहेत. ‘आरसीपीसीएच’चं म्हणणं आहे, मुलांमध्ये थोडासा जरी बदल दिसला, तरी लगेच पालक गुगलून पाहतात, लक्षणं जुळवून पाहतात आणि आपल्या मुलाला झालेला आजार ठरवूनही टाकतात. या गैरसमजामुळे केवळ पालकांचंच नाही, तर मुलांचंही खूप मोठं नुकसान होतं आहे. कारण, ‘तू आजारी आहेस’ अशा पालकांच्या सततच्या सांगण्यामुळे मुलांनाही वाटायला लागतं, आपण खरंच आजारी आहोत. त्यामुळे त्यांच्यात आपोआपच शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम दिसून येऊ लागतात. त्यामुळे डॉक्टरांच्या या संस्थेनं आता डॉक्टरांनाही बजावलं आहे, पालकांनी कितीही सांगितलं, तरी आभासी लक्षणांवर उपचार करू नका. जर खरोखरच आजाराची लक्षणं दिसत असतील, तरच मुलांवर योग्य तो इलाज करा. लोकांनी जो आजार तुम्हाला सांगितला आहे, त्यावर विश्वास न ठेवता आधी तुम्ही खात्री करा आणि मगच औषधोपचार करा.
‘आरसीपीसीएच’मध्ये असिस्टेंट ऑफिसर आणि कन्सल्टण्ट पेडिॲट्रिशिअन असलेल्या डॉ. एमिलिया वावरजविक काळजीनं सांगतात, अलीकडेच ब्रिटनमध्ये आम्ही एक सर्व्हे केला. त्यात २१६ पेडिॲट्रिशिअन सहभागी झाले होते. त्यातल्या ९२ टक्के डॉक्टरांनी सांगितलं, आम्हाला रोज अशा ‘आभासी आजारांच्या’ कहाण्या आणि पेशंट्सचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर जो अप्रमाणित मजकूर आणि माहिती प्रसारित होते, त्यामुळे परिस्थिती चिंताजनक होते आहे.
दहा कोटी वेळा ‘सर्च’!
खऱ्या डॉक्टरकडे जाण्याऐवजी ‘डॉ. गुगल’कडे जाणाऱ्या लोकांचं प्रमाण ब्रिटनमध्ये किती असावं? गुगलचा वापर करून आजारांची माहिती मिळवून ‘निदान’ करण्याचं प्रमाण फक्त गेल्या वर्षातच तब्बल दहा कोटींपेक्षा जास्त होतं. आजारी नसणाऱ्या अशा आजारी लोकांचं काय करायचं आणि त्यांना कसं समजवायचं या चिंतेत आता सरकारही आहे.