देशात पुरेशी रोगप्रतिकारशक्ती; तिसऱ्या लाटेचा प्रभाव राहील कमी: डॉ. रणदीप गुलेरिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 05:55 AM2021-07-24T05:55:10+5:302021-07-24T05:56:21+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हादरला होता. ही लाट अद्याप ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हादरला होता. ही लाट अद्याप ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली. मात्र, तिसरी लाट तेवढी धोकादायक राहणार नसून देशात नागरिकांमध्ये या महामारीविरोधात पुरेशी रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे मत ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.
दुसऱ्या लाटेत दररोज लाखोंच्या संख्येने नव्या रुग्णांची नोंद होत होती. हजारो रुग्णांचे दररोज मृत्यू होत होते. आरोग्यव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत होती. अशा परिस्थितीतच तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली. मात्र, डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाने दिलासा दिला आहे. ते म्हणाले की, विषाणूमध्ये कसे बदल होतील, याबाबत ठामपणे सांगता येत नाही. मात्र, विषाणूमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता कमी आहे. तसेच देशातील बहुतांश नागरिकांमध्ये विषाणूविरोधात रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे ‘सिरो’ सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे तिसरी लाट तेवढी प्रभावी राहणार नाही, असे मत डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केले.
तिसरी लाट राेखू शकताे
- मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण होईपर्यंत गर्दी तसेच अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे.
- कोरोना नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. तिसरी लाट पसरण्यापासून सध्यातरी आपण रोखू शकतो, असे गुलेरिया म्हणाले.