Dr Ravi Godse on Corona 3rd Wave: “भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही?”; डॉ. रवी गोडसेंनी सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 02:27 PM2022-01-03T14:27:03+5:302022-01-03T14:28:41+5:30
Dr Ravi Godse: ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांनी चाचणी करुच नये, असे डॉ. रवी गोडसे यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली: आताच्या घडीला जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धुमाकूळ वाढत चालला आहे. भारतातही ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे देशभरातील राज्य सरकार पुन्हा एकदा कठोर निर्बंध घालणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातच अमेरिकेतील डॉ. रवी गोडसे यांनी मोठा दिलासा देणारी माहिती दिली आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, असे म्हटले आहे. हा दावा करताना डॉ. रवी गोडसे यांनी काही कारणे सांगितली आहेत.
भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण कोरोना किंवा ओमायक्रॉन संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली असली, तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. देशभरातील रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण प्रचंड वाढते, तेव्हाच कोरोनाची लाट आली, असे म्हणता येते, असे रवी गोडसे यांनी सांगितले. रवी गोडसे यांनी एक ट्विट केले असून, काय करावे आणि काय करू नये, याबाबत माहितीही दिली आहे.
ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांनी टेस्टींग करुच नये
बऱ्याच जणांना जरी कोरोना किंवा ओमायक्रॉनची लागण झाली, तरी त्यांना लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांनी चाचणी करुच नये, असेही रवी गोडसे यांनी म्हटले आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे. तरीही लसीकरणावर आणखी भर देण्याची गरज आहे, असे डॉ. गोडसे म्हणाले. ज्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना ओमायक्रॉनने सीरीयस होण्याचा धोका ६० टक्क्यांनी कमी असतो. तर ज्यांनी तीन डोस घेतले आहेत, त्यांना ८१ टक्क्यांनी धोका कमी असतो. ओमायक्रॉन संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता ८१ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशी माहिती डॉ. रवी गोडसे यांनी दिली.
दरम्यान, रवी गोडसेंनी काही दिवसांपूर्वीच ओमायक्रॉन म्हणजे नॉनसेंस! असे ट्विट केले होते. आता त्यांनी ओमायक्रॉन ही वाईट बातमी! असे ट्विट केले आहे. परंतू ही वाईट बातमी आपल्या कोणासाठी नसून ती डेल्टासाठी आहे. असे ते म्हणत आहेत. रवी गोडसे यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येणार नाही, कारण ओमायक्रॉन हा मोठा झिरो ठरणार आहे, म्हणजेच काहीच होणार नाही, असे गोडसे यांनी म्हटले होते. कोरोनाच्या आधीच्या व्हेरिअंटला गंभीरतेने घेणारे गोडसे यांनी ओमायक्रॉनला सुरुवातीपासून हलक्यात घेतले आहे. ओमायक्रॉन हा शक्तीहीन व्हायरसचा व्हेरिएंट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता त्यांचीच री अन्य तज्ज्ञ ओढू लागले आहेत.