Dr. Ravi Godse on Omicron: भारतातील गाईडलाईन्स चांगल्या, पण एक घोडचूक; पाहा काय म्हणाले डॉ. रवी गोडसे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 11:28 AM2022-01-20T11:28:52+5:302022-01-20T11:29:22+5:30
Dr. Ravi Godse on Omicron: भारताच्या नव्या गाईडलाईन्स या चांगल्या आहेत, परंतु एक घोडचूक असल्याचं रवी गोडसे म्हणाले.
सध्या देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ओमायक्रॉन डेल्टाच्या (Delta Variant) तुलनेत तितका घातक ठरत नसला तरी त्याचं संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काही गाईडलाईन्सही जारी केल्या आहेत. दरम्यान, डॉ. रवी गोडसे यांनी या बहुतांश गाईडलाईन्स या चांगल्या आणि स्पष्ट असल्याचं म्हटलं आहे. परंतु यात एक घोडचूक असल्याचंही ते म्हणाले.
"भारतानं जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्स या सोप्या, सरळ आहेत. ओमायक्रॉन हा साधा विषाणू आहे. तिसरी लाटही काही येणार नाही. रुग्णसंख्या कितीही वाढली, तरी रुग्णालयात दाखल करावं लागणाऱ्यांची संख्या खुप कमी आहे. ओमायक्रॉनमुळे रुग्णालयात रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी आहे. जर तुम्ही लसीचे दोन डोस घेतले असतील, तर ती शक्यता अजून कमी होते. जरी कोणी रुग्णालयात पोहोचलं तरी त्यांचा मृत्यू होण्याची किंवा व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता कमी आहे," असं रवी गोडसे म्हणाले.
"भारतानं सौम्य, मध्यम आणि तीव्र लक्षणं अशी विभागणी केली आहे. जर तुम्हाला सौम्य लक्षणं असतील तर तुम्ही घरीच उपचार घ्या असं आयसीएमआरनं सांगितलं. दुसरं कोणतंही औषध घेऊ नका हे त्यांनी सांगितलंय हे अगदी चांगलं केलं आहे. या ठिकाणी दोन औषधं आहेत, पण त्यांना आयसीएमआरनं अनुल्लेखानं मारलं आहे. ज्यांना रुग्णालयात जायची गरज नाही, त्यांच्यासाठी दोन औषधं आहेत आणि ते ओमायक्रॉन, डेल्टाचा ९० टक्क्यांपर्यंत खात्मा करतं. या अती धोका असलेल्या लोकांना दिल्या तर लाट वगैरे काही येणार नाही," असंही ते म्हणाले. ती औषधं जगभरात उपलब्ध आहेत.
इतकंच नाही तर ते बांगालादेशातही उपलब्ध आहेत. ही औषधं भारतात कधी येणार, त्याबद्दल काय काम सुरू आहे याबद्दल शब्दही न काढता या गाईडलाईन्स जारी करणं चुकीचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ज्यांना मध्यम स्वरूपाची लक्षणं आहेत, त्याला जो स्टेरॉईडचा डोस देण्यास सांगितला आहे ते साफ चुकीचे आहे आणि ही घोडचूक आहे. ब्राझीलमधून काही स्टडी आलं आहे, त्या हायड्रोस्टेरॉईडनं फायदा होत असल्याचं म्हणतात. पण त्याचा फायदा भारतात होणार नाही. अशा मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड वापरले तर म्युकरमायकोसिसचा कहर माजेल, असंही त्यांनी नमूद केलं.