सॅल्यूट! बारावीनंतर लग्न, मजुरी करून शिक्षण; पतीचा पाठिंबा, आता नावासमोर लागणार डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:38 PM2023-07-25T12:38:53+5:302023-07-25T12:42:39+5:30
साके भारती पतीला मोलमजुरी करून घर चालवण्यात मदत करत होती. बारावी पूर्ण होताच तिचं लग्न झालं.
आंध्र प्रदेशातील एका मजूर महिलेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. लग्नानंतर अनेक वर्षांनी तिने आपले शिक्षण पूर्ण करून आता पीएचडी मिळवून आपल्या नावापुढे डॉक्टर लावलं आहे. डॉ. साके भारतीची यशोगाथा महिलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे धैर्य देते. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील नागुलगुड्डम गावात राहणारी साके भारती एका तुटलेल्या जुन्या झालेल्या झोपडीत राहते. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही.
अनेक वर्षांपासून साके भारती पतीला मोलमजुरी करून घर चालवण्यात मदत करत होती. बारावी पूर्ण होताच तिचं लग्न झालं. साके भारतीचा पती शिवप्रसाद हा मजुरीचं काम करतो. तिला पुढील शिक्षण घ्यायचे होते, परंतु कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिलाही शेतात मजूर म्हणून काम करावं लागलं. आई, पत्नी आणि रोजंदारी मजूर या सर्व कर्तव्यांमध्येही ती तिची स्वप्ने विसरली नाही.
एसएसबीएन डिग्री अँड पीजी कॉलेज अनंतपूरमधून पदवी आणि नंतर केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स केलं. साके भारतीसाठी तिची स्वप्ने पूर्ण करणं सोपं नव्हतं. ती रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची, मग सकाळी लवकर उठायची आणि घरची कामं करायची. त्यानंतर ती काही काळ शेतात काम करायची किंवा कॉलेजला जायची. कॉलेजमधून परत आल्यावर ती संध्याकाळी काही तास काम करायची. त्यानंतर घरातील कामे उरकून तिने अभ्यास सुरू ठेवला.
पतीने दिला पूर्ण पाठिंबा
साके भारतीने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिचा पती शिवप्रसाद याने तिला खूप पाठिंबा दिला. शिवप्रसाद यानेच बारावीनंतर शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका खासगी संस्थेची जाहिरात पाहिली होती. तिथूनच भारतीला शिकवण्याची कल्पना पतीच्या मनात आली. त्यानेच भारतीला पीएचडीमध्ये प्रवेश मिळवून दिला.
प्रोफेसर होण्याचं स्वप्न
साके भारती हिने केमिस्ट्रीमध्ये 'बायनरी लिक्विड मिक्सचर्स'मध्ये पीएचडी केली आहे. साके भारतीला भविष्यात महाविद्यालयात प्राध्यापक व्हायचं आहे. तिला शिक्षणाचे महत्त्व चांगलेच समजले आणि त्यामुळेच घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही तिने आपले शिक्षण पूर्ण केलं. ती तिच्या गावापासून 30 किमी अंतरावर असलेल्या कॉलेजमध्ये जात असे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.