विविध मुद्द्यांवर निष्पक्ष भूमिका मांडण्याचे धाडस डॉ. विजय दर्डा यांनी दाखवले, जैन आचार्य लोकेश मुनीजी यांचे गाैरवाेद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:04 IST2025-04-04T06:15:55+5:302025-04-04T10:04:09+5:30

Jain Acharya Lokesh Muniji: देश आणि समाजाला भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येवर निर्भिडपणे लिखाण करणे हा डॉ. विजय दर्डा यांचा स्वभावगुण असल्याचे मत अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक जैन आचार्य लोकेश मुनीजी यांनी गुरुवारी येथे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत व्यक्त केले.

Dr. Vijay Darda showed the courage to present an impartial stand on various issues, a proud statement by Jain Acharya Lokesh Muniji | विविध मुद्द्यांवर निष्पक्ष भूमिका मांडण्याचे धाडस डॉ. विजय दर्डा यांनी दाखवले, जैन आचार्य लोकेश मुनीजी यांचे गाैरवाेद्गार

विविध मुद्द्यांवर निष्पक्ष भूमिका मांडण्याचे धाडस डॉ. विजय दर्डा यांनी दाखवले, जैन आचार्य लोकेश मुनीजी यांचे गाैरवाेद्गार

 नवी दिल्ली - देश आणि समाजाला भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येवर निर्भिडपणे लिखाण करणे हा डॉ. विजय दर्डा यांचा स्वभावगुण असल्याचे मत अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक जैन आचार्य लोकेश मुनीजी यांनी गुरुवारी येथे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत व्यक्त केले.

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी लिहिलेल्या ‘द चर्न’ या पुस्तकाचे प्रकाशन जैन आचार्य लोकेश मुनीजी यांच्या हस्ते इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे पार पडले. यावेळी केंद्रीय मत्सव्यवसाय आणि पंचायती राज राज्यमंत्री सत्यपालसिंग बघेल, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन, काँग्रेस नेते राजीव शुक्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे आणि ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई व्यासपीठावर उपस्थित होते.

आचार्य लोकेश मुनीजी पुढे म्हणाले की, खासदार, पत्रकार आणि साहित्यकार या त्रिवेणी संगमाचा अद्भुत समन्वय म्हणजे डॉ. विजय दर्डा होय. आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक जण लिहिताना मागे-पुढे पाहतात. मात्र, विजय दर्डा देश आणि समाजाला भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येवर निष्पक्षपणे लिहितात. कारण ते मुळात निर्भिड आहेत.  ‘द चर्न’ या पुस्तकाला कुणी ‘चर्न’ म्हटले आहे तर कुणी ‘चुरण’ म्हणाले.  

ते ‘पूर्ण’ आहे, असे नमूद करीत आचार्य लोकेश मुनीजी म्हणाले की, हे पुस्तक नवीन खासदारांना प्रकाशस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणार आहे. भविष्यात आपल्याला खासदार, पत्रकार आणि साहित्यकार हा त्रिवेणी संगम पुन्हा बघायला मिळेल, अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर  आवाज उठवला : बघेल
केंद्रीय राज्यमंत्री प्रो. सत्यपालसिंग बघेल म्हणाले की, हे पुस्तक त्यांच्या भाषणांचे संकलन आहे. त्यांच्या भाषणांवरून हे स्पष्ट होते की ते देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांबद्दल किती जागरूक आहेत. वर्तमानपत्र असो वा राज्यसभा, डॉ. विजय दर्डा यांनी सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर प्रभावीपणे आवाज उठवला आहे.
सामाजिक, राजकीय क्षेत्रात अतुलनीय काम : पटेल
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले की, डॉ. विजय दर्डा यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना अतुलनीय काम केले आहे. १८ वर्षांच्या राजकीय वाटचालीचा अनुभव ‘द चर्न’ या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. प्रत्येकाला राजकीय, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात ‘चर्न’चा अनुभव येतो. या पुस्तकात विचार आणि भाषणाचा संग्रह आहे. महत्वाचे म्हणजे, पुज्य बाबूजी स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दर्डा यांचा देशाप्रती समर्पणाचा वारसा विजयबाबू चालवित असल्याचे प्रतिबिंब ‘द चर्न’मध्ये दिसून येते, असेही ते म्हणाले.
खासदारकीचा उपयोग समाजहितासाठी केला : शुक्ला
कॉग्रेस नेते राजीव शुक्ला म्हणाले की, परिस्थिती कोणतीही असो. त्यातून मार्ग कसा काढायचा, हे डॉ. विजय दर्डा यांच्यापासून शिकायला हवे. राज्यसभेचे खासदार असताना असा एकही दिवस गेला नाही की जेव्हा त्यांनी देश आणि समाजातील समस्यांना वाचा फोडली नाही. शून्य प्रहर असो, लक्षवेधी असो किंवा संशोधन असो, प्रत्येक व्यवस्थेचा उपयोग त्यांनी समाजहितासाठी केला आहे. डॉ. विजय दर्डा यांनी पुन्हा संसदेत यावे आणि त्यांचा सहवास लाभावा, अशी इच्छाही शुक्ला यांनी व्यक्त केली.
मैत्रीचे दुसरे नाव डॉ. दर्डा : हुसैन
माजी नागरी उड्डाण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शाहनवाज हुसैन म्हणाले की, आपल्याला अनेक लोक प्रभावित करतात. परंतु, डॉ. विजय  दर्डा याच्याही पलिकडचे आहेत. २५ वर्षांपूर्वी झालेली आमची मैत्री अजूनही कायम आहे. मैत्रीचे दुसरे नाव म्हणजे डॉ. विजय दर्डा, असे ते म्हणाले. तरुण नांगिया यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली तर चांदनी सेहगल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

तर मी एवढा मोठा झालो नसतो : रामदास आठवले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत हिंदी शायरीने भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, विजय दर्डाजी जवाहरलाल दर्डाजी का सपना कर रहे पूर्ण, इसिलिए आपने किताब लिखी हैं ‘चूर्ण’. नागपुरातून सुरू झालेल्या दैनिक लोकमतने दलित, गरीब, महिला आणि शेतकरी अशा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही ते म्हणाले. मी दलित पँथरमध्ये असताना आंदोलन करायचो. तेव्हा माझे पूज्य बाबूजी श्री. जवाहरलाल दर्डा यांच्याशी चांगले संबंध होते. जर लोकमतने माझ्या बातम्या प्रकाशित केल्या नसत्या तर मी एवढा मोठा झालो नसतो, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. 

पुस्तक वाचून ठरवेन कोणते मुद्दे उचलायचे : सुनील तटकरे
संसदेत प्रवेश झाल्यानंतर एखाद्या नवख्या खासदाराने कोणती भूमिका घ्यायची, विषय आणि प्रश्न कसे मांडायचे, हे शिकण्याची संधी ‘द चर्न’मधून मिळते, असे मत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. 
मी आमदार झालो तेव्हा डॉ. दर्डा राज्यसभेचे अपक्ष खासदार म्हणून निवडून आले. अपक्ष निवडून येण्याची किमया फक्त तेच करू शकतात. ‘द चर्न’ या पुस्तकाचे रोज एक पान वाचेन आणि दुसऱ्या दिवशी संसदेत कोणते मुद्दे उचलायचे हे ठरवेन, असेही ते म्हणाले.

डॉ. दर्डा धाडसी : राजदीप सरदेसाई
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई म्हणाले की, विविध क्षेत्रांमध्ये काम करीत असूनही डॉ. दर्डा यांची ऊर्जा तसूभर कमी झालेली नाही. धाडसी होऊन समाजात काम करणे कठीण असते. मात्र डॉ. दर्डा यांनी हे काम लीलया केले आहे.

 

Web Title: Dr. Vijay Darda showed the courage to present an impartial stand on various issues, a proud statement by Jain Acharya Lokesh Muniji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.