भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची 17व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 01:33 PM2019-06-11T13:33:17+5:302019-06-11T13:34:28+5:30
टिकमगडचे भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची 17व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी दिल्लीः टिकमगडचे भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची 17व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या खासदारांना ते सदस्यता आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. त्यांनी आतापर्यंत सात वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. वीरेंद्र कुमार हे दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात. मध्य प्रदेशातील टिकमगडचे खासदार वीरेंद्र कुमार हे सागर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी सागर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा विजय मिळवला आहे. तर तीन वेळा ते टिकमगड मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
मोदींच्या नेतृत्वातील पहिल्या सरकारमध्ये ते अल्पसंख्याक मंत्रालय आणि महिला बालविकास मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. लोकसभेच्या अध्यक्षाची निवड केली जात नाही, तोपर्यंत हंगामी अध्यक्ष कामकाज सांभाळतात. हंगामी अध्यक्ष हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीला केलं जातं. हंगामी अध्यक्ष सभागृहातील इतर खासदारांना शपथ देतो. नव्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर हंगामी अध्यक्षांचा कार्यभाग संपुष्टात येतो.
BJP MP Dr Virendra Kumar to be the Protem Speaker of the 17th Lok Sabha. pic.twitter.com/kjKZpkOPkD
— ANI (@ANI) June 11, 2019
कोण असतो हंगामी अध्यक्ष ?
जो प्रतिनिधी निवडणुकीनंतर पहिल्या सत्रात स्थायी अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाची निवड होईपर्यंत लोकसभा किंवा विधानसभेचं काळजीवाहू अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळतो, त्याला हंगामी अध्यक्ष म्हटलं जातं. हंगामी अध्यक्षांचा कार्यकाळ हा फार कमी असतो. सामान्यतः सदनातल्या वरिष्ठ सदस्याला ही जबाबदारी सोपवली जाते. लोकसभेच्या अध्यक्षाची निवड होत नाही, तोपर्यंतच हंगामी अध्यक्ष हा कार्यभार सांभाळतो. जेव्हा सदनातील अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद रिकामी असेल, तेव्हाच हंगामी अध्यक्षांची गरज लागते.