डॉ. वीरेंद्र कुमार हंगामी लोकसभाध्यक्ष, दोनदा अध्यक्षपद पाच जणांना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 08:28 AM2019-06-12T08:28:02+5:302019-06-12T08:28:09+5:30
लोकसभेचे अध्यक्ष पुढील सभागृहात नसण्याची गेल्या १५ वर्षांपासूनची परंपरा यंदाही कायम राहिल्याने आता हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ खासदार वीरेंद्र कुमार काम पाहणार आहेत.
नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष पुढील सभागृहात नसण्याची गेल्या १५ वर्षांपासूनची परंपरा यंदाही कायम राहिल्याने आता हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ खासदार वीरेंद्र कुमार काम पाहणार आहेत. ते मध्यप्रदेशच्या टिकमकढ मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले आहेत. तेच सर्व निर्वाचित खासदारांना शपथ देतील. १६ व्या लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी यावेळी निवडणूक न लढविल्याने त्या १७ व्या लोकसभेमध्ये नाहीत. आतापर्यंतच्या लोकसभांमध्ये सदनाचे अध्यक्षपद दोनदा भूषविण्याची संधी पाच व्यक्तींना मिळाली आहे.
वर्ष २०१४ मध्ये अस्तित्वात आलेल्या १४ व्या लोकसभेत आधीचे अध्यक्ष नव्हते. यंदाही ही परंपरा कायम आहे. सुमित्रा महाजन यांनी निवडणूक लढवली नव्हती. १३ व्या लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी २००४ मधील निवडणुकीत पराभूत झाले.
त्यानंतर १४ व्या लोकसभेचे अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनीही निवडणूक लढविली नव्हती, तर पंधराव्या लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमार २०१४ च्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या आणि सोळाव्या लोकसभेमध्ये दिसल्या नाहीत.
आतापर्यंत गणेश मावळणकर, शिवराज पाटील, मनोहर जोशी आणि सुमित्रा महाजन या मराठी व्यक्तींना या पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. पहिले अध्यक्ष गणेश मावळणकर हे द्विभाषिक मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व करीत होते.
लोकसभेचे अध्यक्षपद दोन वेळा भूषविण्याची संधी आतापर्यंत पाच जणांना मिळाली. यामध्ये एम.ए. अय्यंगार (पहिली व दुसरी लोकसभा), गुरुदयालसिंह धिल्लाँ (चौथी व पाचवी लोकसभा), बलराम जाखड (सातवी व आठवी लोकसभा), जी.एम.सी. बालयोगी (बारावी व तेरावी लोकसभा) यांचा समावेश
आहे.
>संजीव रेड्डी यांचा आदर्श
चौथ्या आणि सहाव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून एन. संजीव रेड्डी यांची निवड झाली होती. लोकसभेचे अध्यक्ष पक्षातीत असावेत, या संसदीय परंपरेचे पालन करण्यासाठी त्यांनी लगेचच कॉँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.त्यानंतर मात्र कोणीही या आदर्शाचे पालन केलेले नाही. रेड्डी यांना दोनदा राष्टÑपतीपदाची उमेदवारी मिळाली. पहिल्या वेळेस, १९६९ मध्ये त्यांचा पराभव झाला, तर दुसऱ्या वेळेस (१९७७) त्यांना राष्टÑपतीपद मिळाले.
>रवी राय यांची मागणी
भारताने ब्रिटनच्या संसदीय लोकशाहीनुसार संसदीय व्यवस्था ठेवली आहे. त्यामुळे तेथील अनेक प्रथा, परंपरांचे ब्रिटनमध्ये निवडणूक जाहीर झाल्यावर सदनाचे अध्यक्ष, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांची बैठक होते. त्यामध्ये अध्यक्ष कोठून निवडणूक लढणार हे ठरते. तिथे अन्य पक्ष आपला उमेदवार उभा करीत नाहीत. त्यामुळे अध्यक्षांचे पक्षातीत असणे अधोरेखित होते. भारतानेही याच परंपरेचे पालन करावे, अशी मागणी नवव्या लोकसभेचे अध्यक्ष रवी राय यांनी केली होती. अर्थात, ती मागणी कोणीच मान्य केली नाही.