खबरदार! डॉक्टरांवर हात उचलाल तर 10 वर्ष जेलची हवा खाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 08:02 AM2019-06-18T08:02:37+5:302019-06-18T08:03:48+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सोमवारी देशभरात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद होते.
नवी दिल्ली - कोलकाता येथे झालेल्या डॉक्टर मारहाणीच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशननेदेखील पाठिंबा दिला आहे. सोमवारी देशात आयएमएकडून कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं होतं. त्यामुळे अनेक ठिकाणी रुग्णसेवेचा बोजवारा उडाला होता. डॉक्टरांना सुरक्षा देण्यासाठी कायदा बनवावा अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
आयएमएने याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहून डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी कडक कायदा बनवावा अशी मागणी केली आहे. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने वैद्यकीय सेवा सुरक्षा कायदा 2017 रोजी प्रस्तावित केला होता. त्यामध्ये डॉक्टरांना मारहाण केल्यास 10 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड अशाप्रकारचा प्रस्ताव देण्यात आला होता. तो कायदा पुन्हा एकदा कोलकात्याच्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. सध्या आयएमएकडून सात वर्ष जेलची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सोमवारी देशभरात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद होते. शिवाय, रेडिओलॉजिस्ट संघटनांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. निवासी डॉक्टरांच्या मार्ड आणि इंटर्न डॉक्टरांच्या अस्मि या संघटनांनीही काळ्या फिती बांधून आंदोलनात सहभाग घेतला. परिणामी, या बंदमुळे खासगी रुग्णालयातील रुग्णांचा ओढा शासकीय आणि पालिका रुग्णालयांत वळल्याचे दिसून आले. या सर्व संघटनांनी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा लागू करण्याची प्रमुख मागणी केली आहे.
कृतिशील धोरण राबवा
देशभरातील रुग्णालयांत एकसारखी सुरक्षा व्यवस्था लागू करावी. वॉर्डमध्ये प्रवेशासाठी एसओपी (स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर) बनविले जावे. रुग्णालयांत सुरक्षा गार्डची संख्या वाढवून बंदूकधारी गार्ड तैनात करावे. वैद्यकीय विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवावी. सीसीटीव्ही बसवावेत. रुग्णालयांत सुरक्षेसाठी हॉटलाइन अलार्म सिस्टम बसवावी. सुरक्षेची नियमित तपासणी करावी, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. - डॉ. सुहास पिंगळे, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, राज्य
...त्यानंतर ठरणार पुढची भूमिका
मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल येथे या हल्ल्याप्रकरणी जो निर्णय घेण्यात येईल, त्यानंतरच राज्यातील संघटना पुढची भूमिका जाहीर करतील.- डॉ. नीलिमा वैद्य-भामरे, सचिव, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटंट