दिल्ली परिसराची ‘युवा भूषण’ स्पर्धा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 03:31 AM2017-12-04T03:31:19+5:302017-12-04T03:31:23+5:30
युवक बिरादरीची नॉयडा शाखा व मराठवाड्यातील महात्मा गांधी मिशनचे नॉयडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या विद्यमाने दिल्ली परिसरात युवा भूषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
नवी दिल्ली : युवक बिरादरीची नॉयडा शाखा व मराठवाड्यातील महात्मा गांधी मिशनचे नॉयडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या विद्यमाने दिल्ली परिसरात युवा भूषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार पियुष सिंग, दुसरा पुरस्कार संजीवनी सिंग व तृतिय पुरस्कार अवनी चंद यांना मिळाला. दिल्ली आकाशवाणीचे माजी वक्ते व ख्यातनाम लेखक उमाकांत खुबाळकर यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी या ३ विजेत्यांना मुंबईत पाठवले जाणार आहे.
पद्मश्री क्रांती शाह यांनी ४५ वर्षांपूर्वी युवक बिरादरीची स्थापना केली. विविध राज्यात रचनात्मक समाजसेवेची चळवळ म्हणून बिरादरी ओळखली जाते. मुंबईत युवक बिरादरीच्या उपक्रमात सक्रिय असलेल्या सुचित्रा गायकवाड यांनी दिल्लीत वास्तव्याला आल्यानंतर ५ वर्षांपूर्वी येथे युवक बिरादरीच्या शाखेची स्थापना केली. इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून आयोजित केलेली युवा भूषण ही राष्ट्रीय स्पर्धा हा या उपक्रमाचाच एक भाग होता.
लोकमतचे दिल्लीचे संपादक सुरेश भटेवरा यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ही स्पर्धा प्रामुख्याने अॅप्टिटयूड टेस्ट, जीवनमूल्यांची चाचणी, व्यक्तिगत व सामुहिक चर्चासंवाद, शारिरिक क्षमता व अंतत: व्यक्तिगत मुलाखती अशा ५ टप्प्यात पार पडली. उद्घाटन सोहळयाचे स्वागत अवनी चंद या स्पर्धक विद्यार्थीनीने केले, प्रीतम गायकवाड यांनी बिरादरीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख अतिथी या नात्याने उमाकांत खुबाळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर बिरादरीच्या संचालिका स्वर शाह यांनी स्पर्धकांना शुभेच्छा मनोगत व्यक्त केले.