द्रौपदी मुर्मू नव्या राष्ट्रपती! सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 05:22 AM2022-07-22T05:22:11+5:302022-07-22T05:23:07+5:30
द्रौपदी मुर्मू या शाळेत वर्गाच्या मॉनिटर होत्या. त्या आता देशाच्या मॉनिटर बनल्या आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांच्या गावातील रहिवाशांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपतिपदी भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (६४) यांची प्रचंड मताधिक्यांनी निवड झाली. या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला आणि भारताच्या दुसऱ्या महिला आहेत. मुर्मू यांची या पदावर निवड करून भारताने नवीन इतिहास रचला. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती असतील.
ओडिशाच्या कन्या असलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्या रायरंगपूर गावासह राज्यभरात जल्लोषाचे वातावरण आहे. मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर येथील त्यांच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमली असून, त्यांचे सासर असलेल्या पहाडपूर गावातही लोक जल्लोष करीत आहेत.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांनीही मुर्मू यांचे अभिनंदन केले. तिसऱ्या फेरीअखेर द्रौपदी मुर्मू यांनी एकूण वैध मतांपैकी ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडून विजय निश्चित केला होता.
६४% मते द्रौपदी मुर्मू - ६,७६,८०३ मते, ३६% मते यशवंत सिन्हा - ३,८०,१७७ मते मुर्मू ठरतील उत्कृष्ट राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदी उत्कृष्ट कामगिरी बजावतील असा सर्वांना विश्वास आहे. आदिवासी समाजातील कन्येला राष्ट्रपती करून भारताने इतिहास घडविला आहे. मुर्मू या गरीब, दुर्बल घटक तसेच तळागाळातील व्यक्तींसाठी आशेचा किरण बनल्या आहेत. मुर्मू यांचे आयुष्य, त्यांनी केलेला संघर्ष व देशसेवा हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. मुर्मू यांनी आमदार, मंत्री तसेच झारखंडच्या राज्यपाल म्हणून उत्तम काम केले होते. तशीच उत्कृष्ट कामगिरी त्या राष्ट्रपती असताना देखील करतील.
वर्गातील मॉनिटर झाल्या देशाच्या मॉनिटर
द्रौपदी मुर्मू या शाळेत वर्गाच्या मॉनिटर होत्या. त्या आता देशाच्या मॉनिटर बनल्या आहेत अशी प्रतिक्रिया त्यांच्या गावातील रहिवाशांनी व्यक्त केली.
पहाटे साडेतीनला होतो त्यांचा दिवस सुरू
द्रौपदी मु्र्मू यांचा रोजचा दिवस पहाटे साडेतीन वाजता सुरू होतो. त्यानंतर त्या योग, ध्यानधारणा व व्यायाम करतात. हा दिनक्रम कधीही चुकवत नाहीत.
विक्रमांचा इतिहास
सर्वाधिक अंतराने विजय १९५७ राजेंद्र प्रसाद ९९.३% मते, सर्वात कमी अंतराने विजय १९६९ व्ही. व्ही. गिरी
५०.३% मते