Draupadi Murmu : "15 मिनिट आधी मोदींचा फोन आला अन्..."; द्रौपदी मुर्मूंनी सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 10:06 AM2022-07-16T10:06:56+5:302022-07-16T10:24:22+5:30
Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू यांनी आपण ही निवडणूक का लढवत आहोत, याचं रहस्य सांगितलं आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदासाठी येत्या 18 जुलैला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चर्चा करून एनडीएकडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी याबाबत घोषणा केली. तर दुसरीकडे विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले आहे. राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलैला मतदान होणार असून 21 जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. याच दरम्यान द्रौपदी मुर्मू यांनी आपण ही निवडणूक का लढवत आहोत, याचं रहस्य सांगितलं आहे.
आपल्या समाजातील लोकांना आणि देशाला अभिमान वाटावा यासाठी ही निवडणूक लढवण्याची ऑफर स्वीकारल्याचं मुर्मू यांनू सांगितलं. "ज्यांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही ही संधी कधीच मिळाली नाही, ज्यांना आपण या टप्प्यावर पोहोचू असं कधीच वाटलं नव्हतं. ते आता खूप आनंदी आहेत आणि त्यांना खूप आशा आहेत. ते खूप उत्साहित आहेत" असं म्हटलं आहे. तसेच "21 जूनला माझी उमेदवारी जाहीर करण्याच्या अवघ्या 15 मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन करून माहिती दिली. मला काय झालं असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता."
"मी त्यांना म्हणाले की तुम्ही मला (झारखंडचा) राज्यपाल बनवलं आणि मी माझं कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडत आहे. मात्र, मी हे काम योग्य प्रकारे करू शकेन का? ते (पीएम मोदी) म्हणाले की आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत आणि तुम्हाला हे करायचं आहे. पंतप्रधान दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार करत आहेत आणि त्यांनी आयुष्यात कधीही स्वतःला कमी समजू नये. म्हणून मी ऑफरला हो म्हटलं. माझ्या आयुष्यात हा देश, हा पक्ष आणि देव आहे. त्यामुळे देशातील जनतेला अभिमान वाटावा असा मी विचार केला. मी माझं आयुष्य देशासाठी समर्पित करत आहे. मी माझ्यासाठी नाही तर देशासाठी ही ऑफर स्वीकारली आहे" असं द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना मुर्मू यांच्या जीवनातील संघर्षांवर प्रकाश टाकला. मंत्री म्हणाले की, भाजपला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकही मत नाकारलं जाणार नाही याची खात्री करायची आहे. मतदान कसं करायचं ते त्यांनी खासदारांना समजावून सांगितलं. मुख्यमंत्री चौहान यांनी मुर्मूंचा नगरसेवक ते आमदार, मंत्री आणि राज्यपाल या प्रवासाचा उल्लेख केला. निर्धार असणारी स्त्री म्हणून त्यांनी मुर्मू यांचं वर्णन केलं. चौहान म्हणाले की एनडीएनच्या अध्यक्षपदी मुर्मू यांच्या निवडीमुळे अनेक गैर-एनडीए पक्षही त्यांना पाठिंबा देण्यास भाग पडले आहेत. 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मिळवण्यासाठी मुर्मू देशव्यापी दौऱ्यावर आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.