राज्यगीतातून एक वाक्य वगळल्याने भडकले मुख्यमंत्री; राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 09:03 AM2024-10-19T09:03:25+5:302024-10-19T09:04:38+5:30
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्र सरकारकडे राज्यपालांना परत बोलावण्याची मागणी केली आहे.
Tamil Nadu Anthem :तामिळनाडूमध्ये हिंदी महिन्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात गायकांनी तामिळनाडूचे राज्यगीत गायले. पण गाण्यातून एक शब्द गायब होता. त्यावरून तामिळनाडूमध्ये मोठा राजकीय गदारोळ सुरू झालाय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राज्यपालांवर टीका केली. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, राज्यपाल आरएन रवी यांनी हे आरोप दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. देशाच्या आत आणि बाहेर अशा शक्ती आहेत ज्यांना विकासात अडथळे आणायचे आहेत, असं राज्यपालांनी म्हटलं.
चेन्नईमध्ये दूरदर्शनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी हिंदी महिन्याच्या समारोपाच्या वेळी गायलेल्या 'तमिळ थाई वाझ्थु' या राज्यगीतामधून द्रविडियन शब्द काढून टाकल्याबद्दल राज्यपाल आर.एन. रवीवर निशाणा साधला. दूरदर्शनच्या चेन्नई कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासह राज्यपाल आर.एन. रवी सहभागी झाले होते. या वादानंतर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारकडे राज्यपालांना परत बोलावण्याची मागणी केली आहे.
मात्र, राजभवनाने स्टॅलिन यांनी केलेल आरोप फेटाळून लावले आहेत. राज्यपाल आर.एन. रवी फक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि ज्यांनी हे गाणे गायले त्यांच्याकडून अनवधानाने हा शब्द राहून गेला. राज्यगीत गाणाऱ्या गायकांनी चुकून 'थेक्कामुम अधीरसिरंधा द्रविड नल थिरुनाडुम' ही ओळ वगळली होती, जी द्रविड भूमीतील एका महिलेचा संदर्भ देते. ही ओळ वगळल्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राष्ट्रगीतामधून द्रविड हा शब्द काढून टाकण्याचे धाडस राज्यपाल करतील का, असा सवाल केला. स्टॅलिन यांनी हा तामिळनाडू आणि तमिळ भाषेचा अपमान असल्याचे म्हटले आणि राज्यपाल रवी यांना द्रविडांची ॲलर्जी असल्याचे सांगून केंद्राकडे त्यांना तात्काळ हटवण्याची मागणी केली.
"राज्यगीतामधून द्रविड शब्द काढून टाकणे तामिळनाडूच्या कायद्याविरुद्ध आहे. कायद्याचे पालन न करणारी व्यक्ती पदावर राहण्यास पात्र नाही. भारताचा उत्सव साजरा करण्याच्या नावाखाली राज्यपाल देशाच्या एकात्मतेचा आणि विविध जातींच्या लोकांचा अपमान करत आहेत. राष्ट्रगीतातूनही द्रविड शब्द टाकण्यास राज्यपाल सांगतील का? केंद्र सरकारने तात्काळ राज्यपालांना बोलावले पाहिजे कारण ते जाणूनबुजून तामिळनाडू आणि तेथील जनतेच्या भावनांचा अपमान करत आहेत," असं मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन म्हणाले.
दरम्यान, राज्यपाल रवी यांनी या प्रकरणावर स्टॅलिन यांनी आपल्या विरोधात अवास्तव विधाने केली असून त्यांना जातिवादी म्हटले आहे. प्रत्येक कार्यक्रमात ते तमिळ थाई वाझ्थू पूर्ण आदराने गातात, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यपालांचे माध्यम सल्लागार थिरुग्नाना संबंदम यांनी एका निवेदनात म्हटले की, गायकांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला द्रविडीयन शब्द असलेली ओळ अनवधानाने वगळली होती. त्यांनी या प्रकरणाची माहिती आयोजकांना देऊन अधिकाऱ्यांनी याकडे योग्य लक्ष देण्याची विनंती केली.