दाढी काढा, अन्यथा जीव देईन; पत्नीची धमकी
By admin | Published: July 19, 2016 05:58 AM2016-07-19T05:58:59+5:302016-07-19T05:58:59+5:30
‘दाढी काढा अन्यथा जीव देईन’ अशी धमकी पत्नी देत असल्याने येथील एक मौलवी धर्मसंकटात सापडले आहेत.
मेरठ : ‘दाढी काढा अन्यथा जीव देईन’ अशी धमकी पत्नी देत असल्याने येथील एक मौलवी धर्मसंकटात सापडले आहेत. आपली पत्नी आपल्या इच्छेविरुद्ध परपुरुषांशी स्मार्टफोनवरून गप्पागोष्टी करते, असा आरोपही त्यांनी केला.
अर्शद बद्रुद्दीन (३६) असे या मौलवींचे नाव असून, त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन पत्नीचे समुपदेशन करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी पंकज यादव यांना दिलेल्या तक्रारीत अर्शद यांनी म्हटले आहे की, ‘मी पेश इमाम असून, इस्लामचा सच्चा अनुयायी आहे. हापूड जिल्ह्यातील सहाना हिच्याशी २००१ मध्ये माझा विवाह झाला. तिला सलमान खान, शाहरूख खान या अभिनेत्यांसारखे दाढी केलेले लोक आवडतात. त्यामुळे विवाहानंतर मी दाढी ठेवू नये, अशी मागणी तिने केली. तिने एक स्मार्टफोनही विकत घेतला असून, त्यावरून ती परपुरुषांशी रात्रंदिवस बोलत असते.’
‘माझ्यासारख्या मौलवीला दाढी ठेवावी लागते, हे मी तिला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती बधत नाही. आम्हाला चार मुले झाली. तरीही तिने तिची मागणी सुरूच ठेवली आहे. सारखे फोनवर बोलत जाऊ नकोत, तसेच वळण मुलांना लागेल आणि मग त्यांना शिस्त लावणे कठीण बनेल, असे मी तिला वारंवार सांगितले. मात्र, ती ऐकत नाही. तिच्या या वर्तणुकीला मी वैतागलो आहे. मी अलीकडे तिच्यावर रागावलो, तेव्हा तिने रडायला सुरुवात करून, मुलांना विष पाजून जीव देण्याची धमकी दिली,’ असे त्यांनी म्हटले आहे.
>पाश्चात्य पद्धतीच्या कपड्यांवरून भांडण
ईदनिमित्त पत्नी स्वत:साठी आणि मुलांसाठी पाश्चात्य पद्धतीचे कपडे खरेदी करू इच्छित होती. ईदच्या खरेदीसाठी तिच्यासोबत जाण्यास मी नकार दिल्यानंतर, तिने माझ्याशी भांडण करून आत्महत्येची धमकी दिली. ईदच्या दुसऱ्या दिवशी तिने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले.
मी आत डोकावलो असता, ती गळफास घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मला दिसले. मी लगेच कुटुंबातील इतर सदस्यांना बोलावून दार तोडले. सुदैवाने तिला वाचविण्यात आम्हाला यश आले.