शानदार! जबरदस्त!! शत्रू कितीही लपला तरी फडशा पाडणार; हवाई दलाच्या हाती नवं अस्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 07:43 AM2021-11-04T07:43:43+5:302021-11-04T07:47:57+5:30
डीआरडीओनं विकसित केलेल्या यंत्रणेची यशस्वी चाचणी; शत्रूला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची क्षमता
भारतीय हवाई दलानं लढाऊ विमानांच्या सामर्थ्यात वाढ केली आहे. शत्रूला पाणी पाजण्यासाठी विमानांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. त्यामुळे शत्रू कुठेही जाऊन लपला, तरीही विमानातून टाकले जाणारे बॉम्ब त्याला शोधून काढतील. या अत्याधुनिक अस्त्राच्या दोन चाचण्या झाल्या आहेत. पहिली चाचणी २८ ऑक्टोबरला, तर दुसरी चाचणी ३ नोव्हेंबरला झाली. या दोन्ही चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय हवाई दलानं स्वदेशी पद्धतीनं विकसित केलेल्या स्मार्ट अँटी-एअरफिल्ड हत्याराच्या दोन उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या. सॅटेलाईट नेव्हिगेशन आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल सेन्सरवर आधारित दोन चाचण्या करण्यात आल्या. लाँग रेंज बॉम्बची चाचणी पहिल्यांदाच इलेक्ट्रो ऑप्टिकल सीकर तंत्रज्ञानासोबत करण्यात आली. इलेक्ट्रो ऑप्टिक सेन्सर स्वदेशी पद्धतीनं विकसित करण्यात आले आहेत. राजस्थानच्या जसलमेरमध्ये असलेल्या पोखरणमध्ये चाचण्या घेण्यात आल्या.
यंत्रणा इलेक्ट्रो-ऑप्टिकल कॉन्फिगरेशन इमेजिंग इंफ्रारेड (आयआयआर) सीकर तंत्रज्ञानानं सज्ज आहे. यामुळे हल्ला अधिक अचूक होतो. दोन्ही चाचण्यांमध्ये अपेक्षित परिणाम पाहायला मिळाले. डमी शत्रूला हत्यारानं पूर्णपणे नेस्तनाबूत केलं. या यंत्रणेच्या माध्यमातून १०० किलोमीटर अंतरापर्यंत असलेले शत्रूचे अड्डे उद्ध्वस्त केले जाऊ शकतात.