जय हो! भारतानं जगाला दाखवली ताकद, ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाइलची यशस्वी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 07:52 PM2022-03-23T19:52:38+5:302022-03-23T19:53:26+5:30
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आज मोठं यश प्राप्त झालं आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज अंदमान-निकोबार बेटांवर जमिनीवरुन मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
पोर्ट ब्लेअर-
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आज मोठं यश प्राप्त झालं आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (Diffence Research and Development Organization) आज अंदमान-निकोबार बेटांवर जमिनीवरुन मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्र चाचणी पाहण्यासाठी एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि इतर संरक्षण अधिकारी उपस्थित होते. क्षेपणास्त्रानं आपल्या लक्ष्यावर अचूक मारा केल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्याने दिली आहे.
India today successfully testfired surface to surface BrahMos supersonic cruise missile in Andaman & Nicobar. Extended range missile hit its target with pinpoint accuracy: Defence officials pic.twitter.com/Yz54DAyTxq
— ANI (@ANI) March 23, 2022
एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केलं. ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी ते अंदमान आणि निकोबार बेटावर उपस्थित होते. यापूर्वी, ८ डिसेंबर २०२१ रोजी, ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या एअर व्हर्जनची हवाई दलाच्या लढाऊ विमान सुखोई-30MK-1 मध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. मिसाइलनं निर्धारित मानकांची पूर्तता करत क्षेपणास्त्रानं शत्रूचं ठिकाण नष्ट केलं होतं. सुखोई-३० एमके-१ फायटर जेटमध्ये बसवण्यात आलेले ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी स्तरावर विकसित करण्यात आलं आहे.
दुसरीकडे, भारतीय हवाई दलासाठी ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राचं अपग्रेडेड एअर लॉन्च व्हर्जन तयार केलं जात आहे. त्याची रेंज 800 किमी असेल. म्हणजेच आपली लढाऊ विमानं हवेत असताना एवढ्या दूरवरून शत्रूचं स्थान नष्ट करू शकतील. भारत आता नव्या रणनीतीनुसार क्षेपणास्त्रांची रेंज सातत्यानं वाढवत आहे. फक्त एका सॉफ्टवेअर अपग्रेडसह, क्षेपणास्त्राची श्रेणी 500 किमीनं वाढते. ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे भारतीय हवाई दलाच्या 40 सुखोई-30 MKI लढाऊ विमानांवर तैनात करण्यात आली आहेत. ही क्षेपणास्त्रं अत्यंत अचूक आणि शक्तिशाली असून शत्रूच्या तळांना पूर्णपणे नष्ट करू शकतात.