DRDO ला ओडिशात करायची होती मिसाइल चाचणी, पण कासवांनी गडबड केली अन्...! काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 06:59 PM2023-12-09T18:59:03+5:302023-12-09T19:00:07+5:30
20 किमीच्या परिघात मासेमारीवरही बंदी...
देशातील मुख्य संरक्षण संस्था अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) ओडिशातील व्हीलर बेटावर 3 महिन्यांसाठी मिसाइल टेस्टिंग थांबवली आहे, अशी माहिती ओडिशाचे मुख्य सचिव पीके जेना यांनी दिली आहे. ही टेस्टिंग रोखण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, ऑलिव्ह रिडले कासव. या कासवांची घरटी बांधण्याची वेळ नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत असते. यावर्षी सुमारे 5 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी येथे घरटी बांधली आहेत.
यासंदर्भात बोलताना DRDO चे अधिकारी म्हणाले, क्षेपणास्त्र चाचणी दरम्यानचा प्रखर प्रकाश आणि होणाऱ्या आवाजाने कासवांचे लक्ष विचलित होऊ शकते. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
20 किमीच्या परिघात मासेमारीवर बंदी -
साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात ऑलिव्ह रिडलेची घरटी तयार होण्यास सुरुवात होते. या वर्षी किनारपट्टीवर पहिला ऑलिव्ह रिडले दिसताच, ओडिशा सरकारने 1 नोव्हेंबर 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत संबंधित परिसरात मासेमारीवर बंदी घातली आहे. ज्या ठिकाणी ऑलिव्ह रिडले आहेत, त्यांत धमारा, देवी आणि रुसीकुल्या नदीच्या परिसराचा समावेश आहे. याला लागून असलेल्या किनारपट्टीच्या 20 किमी परिघात 7 महिन्यांसाठी ही बंदी घालण्यात आली आहे.
DRDO नियुक्त करणार नोडल ऑफिसर -
मुख्य वनसंरक्षक सुसांता नंदा यांच्या म्हणण्यानुसार, गंजम जिल्ह्यातील रुषिकुल्या किश्तीमध्ये लाखो समुद्री कासवे घरटी करतात. ऑलिव्ह रिडलेचे कवच आणि अंड्यांचा वापर तेल आणि खतासारख्या अनेक गोष्टीत होतो. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होण्याचाही धोका असतो. टीओआयच्या एका वृत्तानुसार, डीआरडीओ कासवांच्या संरक्षणासाठी फॉरेस्ट टीम सोबतच नोडल अधिकाऱ्याचीही नियुक्ती करणार आहे. याशिवाय, मासेमारी करणाऱ्या नौवा या कासवांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी लष्कर आणि तटरक्षक दलही परिसरात गस्त घालेल.