जीएसटीनंतर साकार होणार स्वप्नातील घर
By Admin | Published: June 16, 2017 03:31 AM2017-06-16T03:31:01+5:302017-06-16T03:31:01+5:30
घर घेण्यासाठी सध्याची वेळ योग्य आहे काय? नेहमी विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर १ जुलैपासून सकारात्मक असणार आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : घर घेण्यासाठी सध्याची वेळ योग्य आहे काय? नेहमी विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर १ जुलैपासून सकारात्मक असणार आहे. कारण, अप्रत्यक्ष कर जीएसटीमध्ये रूपांतरित होणार असल्याने घरांच्या किमती कमी होतील, असा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत.
रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते जीएसटी लागू झाल्यानंतर म्हणजेच १ जुलैनंतर सुरू होणाऱ्या प्रोजेक्टमध्ये जर घर घेतले तर त्याची किंमत आजच्या तुलनेत नक्कीच कमी असेल. सध्याच्या ४.५ टक्के कराला १२ टक्के जीएसटीत रूपांतरित करण्यात आले असले तरी यामागे अनेक फायदे लपले असल्याचे सांगितले जात आहे. नव्या कर पद्धतीनुसार, अनेक छुपे कर हटविण्यात आले आहेत. डेव्हलपर्सला जीएसटीअंतर्गत काही टॅक्स क्रेडिटही मिळेल. तर, गैरमार्गाने घर घेणाऱ्यांचे प्रमाणही कमी होऊ शकेल. बहुतांश राज्यात व्हॅट आणि सेल्स टॅक्समुळे संपत्तीचे दर वाढलेले आहेत. काही डेव्हलपर्स तर जीएसटीपूर्व आॅफर देत आहेत. पण, तज्ज्ञांनी यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
जमिनीच्या कि मती वाढू शकतात
क्रेडाईचे उपाध्यक्ष मनोज गौर म्हणतात की, लक्झरी बंगले, फ्लॅट आणि परवडणारी घरे यावर जीएसटीचा काय परिणाम होईल? याबाबत अनिश्चितता कायम आहे. पण, काही जणांचे असे म्हणणे आहे की, जीएसटीमुळे जमिनी आणि कच्चा माल यांच्या किमती वाढू शकतात.