उन्नावच्या किल्ल्याला पडतात सोन्याच्या खजिन्याची स्वप्ने; हजारो वर्षांचा आहे इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:26 AM2022-02-21T11:26:26+5:302022-02-21T11:28:59+5:30
राजा रामबक्ष सिंह यांनी स्वप्नात येऊन खजिन्याचे सांगितल्याचा असाच दावा शिवली आश्रमाचे महंत शोभन सरकार यांनी सप्टेंबर २०१३ मध्ये केला. त्यांचे मे २०२० मध्ये निधन झाले.
श्रीमंत माने -
संग्रामपूर (उन्नाव) : एका स्वप्नाचा हवाला देत पडक्या किल्ल्यात जमिनीखाली हजार टन सोन्याचा खजिना असल्याचे बुवाने सांगितले म्हणून पुरातत्त्व खात्याने गाजावाजा करीत खोदकाम केल्याच्या वेडपटपणाला आठ वर्षे उलटून गेली खरी. देश, जग ती घटना विसरूनही गेले. गंगेकाठची गावे मात्र अजूनही रोज रात्री अरबो-खरबोचा खजाना उशाशी असल्यासारखे झोपतात. विकासाचे स्वप्न मात्र त्यांना पडत नाही. ठाकूर, यादव, पंडित अशा जातींमध्येच अडकून पडली आहेत.
उन्नावच्या पूर्वेला बिघापूर तहसीलमधील डोंडियाखेडा, भगवानखेडा, कल्याणपूर, तसेच गंगेच्या दक्षिण किनाऱ्यावरील काही असे नऊ मजरे (छोटी खेडी) मिळून संग्रामपूर अशी या टापूची ओळख. जिकडेतिकडे मंदिरे व विटांनी बांधून काढलेल्या विहिरी. १८५७ च्या उठावातील राजा राम बक्ष सिंह हा या परगण्याचा ऐतिहासिक नायक. इंग्रजांनी त्याला फाशी दिली व त्याच्या राज्याची राखरांगोळी केली. डोंडियाखेड्याच्या दक्षिणेला रामेश्वर मंदिर ते गावाजवळचे दयालेश्वर, नांदुलेश्वर व किल्ल्याच्या पश्चिम टोकावर कामेश्वर अशा ९ मंदिरांच्या जमिनीखाली राजा राम बक्ष सिंहचा सोनेनाणे, जडजवाहिरांचा खजिना असल्याचा दावा आजही केला जातो.
राजा रामबक्ष सिंह यांनी स्वप्नात येऊन खजिन्याचे सांगितल्याचा असाच दावा शिवली आश्रमाचे महंत शोभन सरकार यांनी सप्टेंबर २०१३ मध्ये केला. त्यांचे मे २०२० मध्ये निधन झाले. तत्कालिन केंद्रीय मंत्री चरणदास महंत यांच्या आग्रहापोटी पुरातत्त्व खात्याने आठ-दहा दिवस खोदकाम केले. वीस मीटरवर भांड्यांचा आवाज आला फक्त. खजिना वगैरे काही सापडला नाही. पण, देश त्या पंधरा दिवसांत वेडा झाला होता. जग भारताला हसत होते. कुलदीप सेंगरने केला तेवढाच विकास डोंडियाखेड्याचे प्रधान अजयपाल सिंह यांचा मात्र अजूनही त्या खजिन्यावर विश्वास आहे. आठ वर्षांपूर्वी तेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय माध्यमांना परिसर फिरवून दाखवत होते. ‘लोकमत’च्या या प्रतिनिधीलाही त्यांनी सगळा परिसर असाच फिरवून दाखवला. क्षत्रीय सदन नावान भगवानखेडा मजऱ्यात त्यांचा पुश्तैनी वाडा आहे. आम्ही गौतमी गोत्राचे क्षत्रीय.
आजोबा, वडील, पत्नी व स्वत: असे या घराण्याकडे परंपरागत प्रधानपद आहे. आरक्षणामुळे मध्यंतरी यादव व एससीतला प्रधान झाला होता. तरी गावाची सूत्रे आपल्याकडेच होती, असे ते गर्वाने सांगतात. कामेश्वर मंदिराजवळची गंगा नदीवरची एक मोठी उपसा योजना व तिचा तालुक्याच्या उत्तर भागाकडे निघणारा कालवा वगळला तर गावात विकास पोचलेला नाही. रस्ते अत्यंत खराब आहेत. महिलांची साक्षरता पन्नास टक्केच आहे. विकासासाठी पहिली शाळा हवी. मुलेमुली शिकल्या तरच काहीतरी करतील, असे अजयपाल सिंह यांचे म्हणणे. पण, आधी त्यांना पर्यटनस्थळ म्हणून किल्ल्याचा विकास करायचा आहे. कुलदीप सेंगर नावाचे उन्नाव बलात्कार प्रकरणात गजाआड झालेले नेते भगवंतनगरचे आमदार असताना थोडे काम झाले. इथले आमदार हृदयनारायण दीक्षित विधानसभाध्यक्ष होते. आता भाजपने ज्यांचे तिकीट कापले. त्यांनी मात्र काहीही केले नाही, असा प्रधानांचा आक्षेप आहे.
या भूमीला हजारो वर्षांचा इतिहास
- डोंडियाखेडा किल्ल्याजवळ बक्सर येथे गंगामेळा भरतो. रामायण, महाभारतात या परिसराचे उल्लेख आहेत. उन्नाव, फतेहपूर, रायबरेलीचा बराच भाग पूर्वी अर्गल संस्थानात होता.
- त्या राजघराण्यातील राणी व राजकुमारीला अवधच्या मुस्लीम सेनापतीच्या हल्ल्यातून वाचविताना अभयसिंह व निर्भयसिंह या बंधूंनी पराक्रमाची शर्त केली.
- निर्भयसिंहला त्यात वीरमरण आले. अर्गलच्या राजाने खुश होऊन अभयसिंहशी राजकुमारीचा विवाह लावून दिला व बक्सर परगणा सोपविला.
- ब्रिटीश राजवटीत भारतीय पुरातत्त्व खात्याचे संस्थापक अलेक्झांडर कनिंगहम यांनी दावा केला होता, की युआन त्संगने सातव्या शतकात उल्लेख केला ते हयामुखा स्थान डोंडियाखेडा किंवा संग्रामपूर हेच असावे.