नव्या संसदेसाठी ड्रेसकोड; कमळाचा शर्ट अन् नेहरू जॅकेट, गणेश चतुर्थीला होणार श्रीगणेशा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 07:32 AM2023-09-13T07:32:35+5:302023-09-13T07:33:07+5:30
New Parliament: नवीन संसदेत संसद कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कमळाच्या फुलाचे प्रिंट असणारे गुलाबी शर्ट व खाकी पँट तसेच गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट परिधान करावे लागणार आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : नवीन संसदेतसंसद कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कमळाच्या फुलाचे प्रिंट असणारे गुलाबी शर्ट व खाकी पँट तसेच गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट परिधान करावे लागणार आहे.
१९ सप्टेंबरला, गणेश चतुर्थीच्या दिवशीच्या शुभमुहूर्तावर सकाळी ११ वाजता जेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संसदेच्या विशेष अधिवेशनाची कार्यवाही नवीन संसदेत सुरू करतील, तेव्हा संसदेतील कर्मचारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांची वेशभूषा बदललेली असेल. नवा ड्रेसकोड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने (एनआयएफटी) तयार केला आहे.
नव्या ड्रेसकोडनुसार, संसदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता कमळाच्या फुलाचे प्रिंट असलेला गडद गुलाबी रंगाचा शर्ट, खाकी रंगाची पँट व गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट परिधान करावे लागेल. यापूर्वी ते बंद गळ्याच्या गडद निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत होते. महिलाही त्याच रंगाची साडी परिधान करत होत्या.
सुरक्षा कर्मचारी, मार्शलनाही नवा ड्रेस : संसदेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना लष्कराप्रमाणे केमोफ्रेज ड्रेस परिधान करावा लागेल. यापूर्वी ते निळ्या रंगाचा सफारी सूट परिधान करत होते, तर मार्शलला आता मणिपुरी पगडी परिधान करावी लागेल.
१९ सप्टेंबरपासून नव्या संसदेत कामकाज
- १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या पाच दिवसांत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
- पहिल्या दिवशी १८ सप्टेंबर रोजीची बैठक जुन्या संसद भवनात होणार आहे.
- १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा-अर्चना केल्यानंतर शुभमुहूर्तावर नवीन संसदेत कामकाज सुरू होणार आहे.