बॅक गिअरमध्ये २ किमी मागे पळवली i20, पोलीस मागे लागताच केलं असं काही, असा झाला पसार...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 12:28 PM2024-02-22T12:28:17+5:302024-02-22T15:20:00+5:30
Ghaziabad Traffic News: दिल्लीशेजारी असलेल्या गाझियाबादमधील इंदिरापुरम परिसरातील एलिव्हेटेड रोडवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांची एक गाडी एका i20 कारचा पाठलाग करताना दिसत आहे.
दिल्लीशेजारी असलेल्या गाझियाबादमधील इंदिरापुरम परिसरातील एलिव्हेटेड रोडवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांची एक गाडी एका i20 कारचा पाठलाग करताना दिसत आहे. तसेच ही कार बॅक गिअरमध्ये मागच्या दिशेने पळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना आपण एखादा चित्रपट तर पाहत नाही ना, असा प्रश्न पडला आहे. मात्र हे कुठल्याही चित्रपटाचं चित्रिकरण नसून प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. जेव्हा एलिव्हेटेड रोडवर i20 कारला रात्री ९ वाजता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. i20 कार चालवत असलेल्या चालकाने पोलिसांना आपल्याकडे येताना पाहून कार बॅक गिअरमध्ये चालवण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत पोलिसांनी या कारचालकाचा सुमारे २ किमी पर्यंत पाठलाग केला. या दरम्यान, तिथून जात असलेल्या पादचाऱ्याने या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला.
ही घटना बुधवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा i20 रोजी कारला अडवण्याचा प्रयत्न तिथे तैनात असलेल्या पोलिसांच्या गाडीने केला. तेव्हा ड्रायव्हरने कार बॅग गिअरमध्ये पळवण्यास सुरुवात केली केली. मिळालेल्या माहितीनुसार हा कारचालक तिथून पळून गेला. यावेळी या कारचा अनेक वाहनांसोबत टक्कर होऊन मोठा अपघात होता होता वाचला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेचा विषय ठरला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एलिव्हेटेडवर तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तेथून जात असलेल्या एका कारचालकाने एक i20 कार ही रॅश ड्रायव्हिंग करत जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या कारचालकाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मात्र तो पसार झाला. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर वाहनाची ओळख पटवून कारचालकापर्यंत पोहोचण्याचा दावा पोलीस करत आहेत. त्याबरोबरच पोलिसांनी उलट्या दिशेने कारचा पाठलाग केला त्याचाही तपास एसीपी इंदिरापुरमला सोपवण्यात आले आहे.