ड्रायव्हरशिवाय रेल्वे इंजिन गेलं सुसाट, बाईकने 13 किमीपर्यंत केला पाठलाग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 12:43 PM2017-11-09T12:43:34+5:302017-11-09T12:46:05+5:30
कर्नाटकाच्या कलबुर्गीतील वाडी स्टेशनवर इलेक्ट्रिक इंजिन ड्रायव्हरशिवाय 13 किलोमीटर पर्यंत गेलं.
कलबुर्गी- कर्नाटकाच्या कलबुर्गीतील वाडी स्टेशनवर इलेक्ट्रिक इंजिन ड्रायव्हरशिवाय 13 किलोमीटर पर्यंत गेलं. इंजिनला रेल्वे रूळावरून जाताना पाहून ड्रायव्हरने त्याच्या बाइकने इंजिनचा पाठलाग केला. जवळपास 20 मिनिटं पाठलाग केल्यानंतर ड्रायव्हरने नलवार स्टेशनच्या एक किलोमीटर आधी इंजिनला थांबवलं.
चेन्नईकडून येणारी मुंबई मेल एक्स्प्रेस प्रवासी बोगीसह दुपारी तीन वाजता चेन्नईहून वाडी स्टेशनवर पोहचली. या स्टेशनवर इलेक्ट्रिक इंजिन लाइन संपत असून तेथूनपुढे डिझेल इंजिन जोडलं जातं. वाडीपासून ते सोलापूरपर्यंत डिझेल इंजिन सुरू राहत. नेहमीप्रमाणे इलेक्ट्रिक इंजिन बोगीपासून वेगळं झालं आणि एक्स्प्रेस डिझेल इंजिनसह पुढे गेली. साडेतीन वाजता लोको पायलट इंजिनमधून बाहेर आला. त्यानंतर काही वेळाने इंजिन ड्रायव्हरशिवाय सुरू झालं. ते दृश्यपाहून ड्रायव्हरालाही आश्चर्य वाटलं. वाडी स्टेशनवरील अधिकाऱ्यांनी तात्काळ यांची सूचना इतर स्टेशनला दिली आणि इंजिनासाठी रस्ता मोकळा करण्यात आला. इंजिन रूळावरून जात असताना वाडी स्टेशन मॅनेजर जेएन पॅरिस आणि ड्रायव्हरने बाईकवरून त्याचा पाठलाग करायला सुरू केलं.
साधारणपणे तीन वाजून पन्नास मिनिटांनी इंजिनची गती कमी झाली आणि ड्रायव्हरला इंजिनमध्ये चढून ते थांबविण्यात यश आलं. इंजिनला जर वेळीच रोखलं नसतं तर मोठी दुर्घटना घडली असती, असं जेएन पॅरिस यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणावर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.