"काळजी करू नका, मी २० दिवसांत पैसे परत करेन"; चोरी केल्यावर मालकाला पाठवला मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 05:15 PM2024-07-29T17:15:28+5:302024-07-29T17:17:43+5:30
ड्रायव्हरने आधी मालकाच्या घरातून पैसे चोरले आणि नंतर मालकाच्या मुलाच्या मोबाईलवर मेसेज करून याबाबत माहिती दिली.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. ड्रायव्हरने आधी मालकाच्या घरातून पैसे चोरले आणि नंतर मालकाच्या मुलाच्या मोबाईलवर मेसेज करून याबाबत माहिती दिली. काळजी करू नका. मी येत्या २० दिवसांत पैसे परत करेन असं म्हटलं आहे.
पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याच्या घरी नवीन ड्रायव्हरची नियुक्ती करण्यात आली असून, त्याचं नाव दीपक आहे. घराचे मालक कपिल त्यागी पत्नीसह अमेरिकेला गेले आहेत. त्यांचा मुलगा चिरायू त्यागी शनिवारी इंदूरला गेला होता. याच दरम्यान, ड्रायव्हर दीपक कपिल त्यागी यांच्या आईला फिजिओथेरपीसाठी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेला.
दीपकने कपिलच्या आईला क्लिनिकमधून परत घरी सोडलं आणि नंतर निघून गेला. काही वेळाने दीपकने चिरायूच्या मोबाईलवर एक मेसेज केला. मी घरातून ६० हजार रुपये रोख घेतले आहेत. काळजी करू नका. मी २० दिवसांत पैसे परत करेन असं मेसेजमध्ये म्हटलं. मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
पोलीस अधिकारी भूपिंदर कौर संधू यांनी सांगितलं की, आरोपीचं शेवटचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं आहे. सध्या पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झालं आहे. लवकरच अटक करण्यात येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याला रील बनवण्याचा शौक आहे. सोशल मीडियावर त्याने अनेक रील अपलोड केल्या आहेत. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.