पावसाच्या पाण्यात कार घालताय? एचडीएफसीच्या मॅनेजर, कॅशिअरचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 06:18 PM2024-09-14T18:18:26+5:302024-09-14T18:18:48+5:30
पावसाने ताजमहाललाही गळती लावली आहे. एएसआय याची तपासणी करत आहे.
देशात एका मागोमाग एक वेगवेगळ्या भागात पावसाने थैमान घालण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचले होते यामध्ये कार घातल्याने एचडीएफसीच्या मॅनेजर आणि कॅशिअरचा बुडून मृत्यू झाला आहे. कार बंद पडून लॉक झाल्याने ते आतच अडकले होते. बाहेर पडता न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे ४८ तासांत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. आग्र्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसात १८५ घरे कोसळली आहेत. पावसाने ताजमहाललाही गळती लावली आहे. एएसआय याची तपासणी करत आहे. मुख्य गोल घुमटावरील कलशाच्या धातूला जंग लागली आहे, यामुळे दगडाला क्रॅक गेला आहे. यातून पाणी खाली पडत आहे.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-चंबळमध्ये आसन, क्वारी, सिंध आणि चंबळ या नद्यांना उधाण आले आहे. अनेक ठिकाणी पूल आणि पुलांवरून पाणी वाहत आहे. मुरैना येथे ट्रॅक्टर-ट्रॉली नाल्यात पडली. त्यात ३ जण वाहून गेले होते. यापैकी एकाला वाचविण्यात आले आहे.
18 सप्टेंबरनंतर मान्सून पश्चिम राजस्थानमधून परतीला सुरुवात करतो. परंतु यावेळी तो आणखी 16 दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत देशात मुसळधार पावसाची हजेरी असणार आहे. मान्सून परतीच्या प्रवासाला लागला तर ऑक्टोबरमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार या मान्सूनमध्ये आतापर्यंत १०८ टक्के म्हणजेच ८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तरीही देशातील सुमारे एक चतुर्थांश म्हणजेच १८५ जिल्ह्यांमध्ये (२६%) दुष्काळी परिस्थिती आहे.