Driving License New Rules: ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात मोठा बदल; सरकारची नवीन नियमावली, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 03:15 PM2022-05-29T15:15:59+5:302022-05-29T15:17:27+5:30
सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. यानुसार, आता तुम्हाला वाहन परवानासाठी RTO मध्ये जाऊन कोणतीही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही.
नवी दिल्ली - वाहन चालवणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारनं वाहन चालकांना होणाऱ्या मोठ्या त्रासातून त्यांची मुक्तता केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला यापुढे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जावे लागणार नाही. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचे नियम अतिशय सोपे केले आहेत.
ड्रायव्हिंग चाचणी आवश्यक नाही
सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. यानुसार, आता तुम्हाला वाहन परवानासाठी RTO मध्ये जाऊन कोणतीही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत, हे नियम देखील लागू झाले आहेत. एवढेच नाही तर ज्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांनाही यातून दिलासा मिळणार आहे.
ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जा आणि प्रशिक्षण घ्या
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी RTO मधील चाचणीची वाट पाहावी लागणार नाही. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करून घेऊ शकता. त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल, अर्जदारांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडून प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे, अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स जारी केला जाईल.
जाणून घ्या नवीन नियम
- प्रशिक्षण केंद्रांबाबत रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटीही आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रांच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश आहे.
- दुचाकी, तीनचाकी व हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांजवळ किमान एक एकर जागा असणे बंधनकारक आहे.
- मध्यम आणि जड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी केंद्रांसाठी दोन एकर जमीन आवश्यक आहे.
- ट्रेनर किमान १२वी पास असावा आणि त्याला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, वाहतूक नियमांची जाण असावी.
- मंत्रालयाने अध्यापनाचा अभ्यासक्रमही ठरवून दिला आहे. या अंतर्गत, हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी, कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त ४ आठवडे असेल जो २९ तासांचा असेल.
- ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम २ टप्प्यांमध्ये विभागला जाईल. थेअरी आणि प्रॅक्टिकल
- लोकांना सामान्य रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ-उतारावर वाहन चालवायला शिकण्यासाठी २१ तास घालवावे लागतील
- थेअरी टप्पा संपूर्ण अभ्यासक्रमाच्या ८ तासांचा असेल, त्यात रस्त्यावरील मार्गदर्शक सूचना समजून घेणे, रस्त्यावरील रेज, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन चालविण्याची इंधन कार्यक्षमता यांचा समावेश असेल.