BREAKING: जम्मूत आता लष्करी तळावर दिसले दोन ड्रोन; सुरक्षा दलाकडून २५ राऊंड फायरिंग, शोध मोहिम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 12:17 PM2021-06-28T12:17:02+5:302021-06-28T12:18:12+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लष्करी तळांवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लष्करी तळांवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मूच्या एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी दहशतवाद्यांनी लष्करी तळालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. समोर आलेल्या माहितीनुसार, जम्मूच्या कालूचक लष्करी तळावर दोन ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं. लष्कर सज्ज असल्यानं ड्रोन दिसताच त्यावर २० ते २५ राऊंड फायरिंग करण्यात आलं आहे.
कालचूक लष्करी तळावर आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास हे दोन ड्रोन घिरट्या घालत होते. त्यावेळी लष्करानं तातडीनं प्रत्युत्तर देत हवेत फायरिंगला सुरुवात केली. त्यानंतर ड्रोन गायब झाले. लष्करानं सध्या ड्रोनच्या शोध मोहिमेला सुरुवात केली आहे, अशी माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे.
एअरबेसवर काल झाला होता हल्ला
जम्मूच्या एअरफोर्स स्टेशनवर रविवारी रात्री दोन स्फोट झाले होते. पहिला स्फोट रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी तर दुसऱ्या ५ मिनिटांनंतर १ वाजून ४२ मिनिटांनी झाला होता. हवाई दलाच्या माहितीनुसार, या स्फोटांची तीव्रती खूप कमी होती. यातील पहिला स्फोट छतावर झाला. त्यामुळे छताचं नुकसान झालं आहे. तर दुसरा स्फोट मोकळ्या जागेत झाला आहे. यात दोघं किरकोळ जखमी झाले आहेत. ड्रोनच्या सहाय्यानं हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एनआयएकडून आता हल्ल्याची चौकशी केली जात आहे.