ड्रोनने हेरगिरीचा पाकचा प्रयत्न हाणून पाडला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 06:53 AM2021-07-03T06:53:55+5:302021-07-03T06:54:25+5:30
पाच अतिरेक्यांचा खात्मा, एका जवानाला वीरमरण
नवी दिल्ली/इस्लामाबाद : जम्मू सीमेजवळ जबोवाल येथे शुक्रवारी पहाटे पाकिस्तानी ड्रोनचा भारतीय हद्दीत हेरगिरी करण्याचा प्रयत्न सुरक्षा जवानांनी गोळीबार करून हाणून पाडला. तसेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये भारतीय राजदूतावास व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांपाशी एक ड्रोन हेरगिरी करत असल्याचे उघड झाले. या प्रकारानंतर दिल्लीतील पाकिस्तानच्या मुत्सद्दी अधिकाऱ्यास बोलावून भारताने चांगली समज दिली आहे.
काही दिवसांपूर्वी जम्मूमध्ये हवाई दलाच्या केंद्रावर सीमेपलीकडून पाठविण्यात आलेल्या ड्रोनद्वारे बॉम्बहल्ला करण्यात आला होता. त्यानंतरही जम्मूमध्ये ड्रोन विमाने दिसली होती.
इस्लामाबाद येथील भारतीय राजदूतावासामध्ये ड्रोन आढळल्याने सुरक्षा नियमांचा भंग झाल्याचा आक्षेप भारताने पाकिस्तानकडे नोंदविला आहे. जम्मू सीमेवरील जबोवाल या गावी शुक्रवारी पहाटे ४ वाजता जवानांना एक पाकिस्तानी ड्रोन दिसले. ते भारतीय हद्दीत हेरगिरीसाठी घुसखोरी करू पाहत होते.
अद्ययावत प्रणाली बसविणे आवश्यक
जम्मूतील हवाई दलाच्या केंद्रावर बॉम्बहल्ला करण्यासाठी सीमा ओलांडून दोन ड्रोन भारतीय हद्दीत आले; पण त्याचा रडार यंत्रणेला सुगावाही लागला नव्हता. त्यामुळे भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी सीमेवर सर्वच लष्करी तळांवर अद्ययावत प्रणाली कार्यान्वित करणे आवश्यक बनले आहे.
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर चकमकीत ठार
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दल
आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए- तोयबाचे पाच अतिरेकी ठार झाले. तर सैन्याचा एक जवान शहीद झाला. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, मारलेल्या अतिरेक्यांचा संबंध लष्कर-ए-तोयबाशी होता. यातील एक निशाज लोन ऊर्फ खिताब
हा संघटनेचा जिल्हा कमांडर होता, तर अन्य एक पाकिस्तानचा होता. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.