बुडणारे बेट वाचविणार!
By Admin | Published: March 17, 2017 12:52 AM2017-03-17T00:52:53+5:302017-03-17T00:52:53+5:30
कोल्लम जिल्ह्यातील मुनरो थुरुट हे गाव असलेले बेट वाचविण्यासाठी वैज्ञानिक साहाय्य घेतले जाईल, असे केरळ सरकारने मंगळवारी सांगितले
कोच्ची : कोल्लम जिल्ह्यातील मुनरो थुरुट हे गाव असलेले बेट वाचविण्यासाठी वैज्ञानिक साहाय्य घेतले जाईल, असे केरळ सरकारने मंगळवारी सांगितले. त्सुमानीनंतर जमिनीची झालेली धूप आणि समुद्राच्या वाढत्या स्तरामुळे हे गाव बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
२००४ च्या त्सुनामीत मुनरो बेटाचे मोठे नुकसान झाले होते.
कृषी आणि मासेमारी क्षेत्रालाही प्रचंड झळ बसली होती, असे विजयन म्हणाले.
भरतीमुळे वाढत असलेला जलस्तर आणि अष्टामुडी तलावातून झिरपणाऱ्या क्षारयुक्त पाण्यामुळे या बेटाच्या अस्तित्वाला धोका उत्पन्न झाला आहे. बेटावरील अनेक घरेच उद्ध्वस्त झाली असून, रस्ते आणि पदपथांचेही तीनतेरा झाले आहेत. यावर उपाय शोधण्यासाठी सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज् यासारख्या वैज्ञानिक संस्थेची मदत घेतली जाईल. बेट वाचवण्यासाठी हे गरजेचे असून, तलावातील क्षारयुक्त पाण्याचा शिरकाव रोखण्यासाठी बांध घालणे, तसेच खारफुटीची लागवड करणे आदी इतर उपायही करण्यात येणार आहेत, असे विजयन म्हणाले.
जगणे कठीण झाल्यामुळे ४०० कुटुंबांनी बेट सोडले आहे. एकेकाळी येथील भातशेती प्रसिद्ध होती, तसेच नारळाचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात होते; मात्र आता ही परिस्थिती बदलली असून, कृषी क्षेत्र कोलमडले आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे लोकांना त्वचारोग होत आहेत, असे कोवूर म्हणाले. या बेटावर आजही दहा हजारांहून अधिक लोक राहतात.
या गावाचे जतन आणि विकास करण्यासाठी विशेष पॅकेज देण्याची ग्वाही मुख्यमंत्री पी. विजयन यांनी विधानसभेत दिली. मुनरोचे रक्षण करण्यासाठी सरकार सर्व उपाय करील, असेही ते म्हणाले.
आमदार कोवूर कुंजुमोन यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुनरो बेट बुडत चालल्यामुळे तेथील लोकांना भेडसावत असलेल्या समस्यांचा पाढा कोवूर यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला.