देशव्यापी ‘बंद’ने औषध विक्री ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2015 03:09 AM2015-10-15T03:09:20+5:302015-10-15T03:09:20+5:30

आॅनलाइन औषध विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी देशभरातील सुमारे आठ लाख औषध विक्रेत्यांच्या बुधवारच्या एक दिवसीय संपामुळे औषध विक्री पूर्णपणे ठप्प झाली.

Drug sales stopped nationwide | देशव्यापी ‘बंद’ने औषध विक्री ठप्प

देशव्यापी ‘बंद’ने औषध विक्री ठप्प

googlenewsNext

नवी दिल्ली/मुंबई : आॅनलाइन औषध विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी देशभरातील सुमारे आठ लाख औषध विक्रेत्यांच्या बुधवारच्या एक दिवसीय संपामुळे औषध विक्री पूर्णपणे ठप्प झाली.
आॅनलाइन औषध विक्रीने किरकोळ औषध उद्योगाला जबर हादरा दिला असून नियम डावलून होत असलेली विक्री रुग्णांसाठी जोखमीची ठरू शकते, असा इशारा आॅल इंडिया केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट संघटनेने (एआयओसीडी) दिला आहे. महाराष्ट्रातील ५५ हजार किरकोळ औषध विक्रेत्यांसह देशभरातील सुमारे आठ लाख औषध विक्रेते संपात सहभागी झाले व संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा एआयओसीडीचे अध्यक्ष जे.एस. शिंदे यांनी केला.
गर्भनिरोधक गोळ्या, झोपेच्या गोळ्या आणि स्टेरॉईडसची आॅनलाईन विक्री धडाक्यात सुरू आहे. १० अब्ज डॉलरची भारतीय औषध बाजारपेठ काबीज करण्यासाठी अनेक कंपन्यांनी आॅनलाईन औषध विक्रीत उडी घेतली आहे. वन एमजी, झिगी यासारख्या नोंदणीकृत ई- फार्मसीजनी औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी आॅनलाईन प्रिस्क्रिप्शनवर निगराणी ठेवण्यासाठी फार्मासिस्टची चमू स्थापन केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे भारतात ई- रिटेलरसाठी विशिष्ट नियम नसल्यामुळे आॅनलाईन विक्रेत्यांनी कोणतीही शहानिशा न करताच औषध पुरविण्याचा सपाटा लावला आहे. आॅनलाईन विक्रीमुळे औषध दुकानातील विक्रीवर ४० ते ५० टक्के परिणाम झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली. रुग्णांना आणीबाणीच्या काळात औषधे खरेदी करता यावी यासाठी पोस्टर्स आणि वृत्तपत्रांमधून खास टेलिफोन क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले. रुग्णालयांमधील औषधांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेने हा संप ९८ टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. संपादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषधमंत्री गिरीष बापट आणि एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
औषधांची आॅनलाइन विक्री या गंभीर मुद्द्याकडे सरकार लक्ष देईल. जनतेच्या आरोग्याला यामुळे धोका आहे. एक महिन्यात यावर निर्णय घेण्यात येईल. अंतिम निर्णय होण्याआधी तुमची भेट घेऊ . असे प्रकार आढळल्यास सरकारकडे तक्रार नोंदवा. त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष जे.एस. शिंदे यांनी दिली.

(लोकमत न्यूज नेटवर्क)
>>ई-फार्मसी संघटनाही मैदानात
औषध विक्रेत्यांच्या देशव्यापी संपानंतर बेकायदा आॅनलाइन विक्रीच्या विरोधात ई-फार्मसी क्षेत्रातील खासगी कंपन्यांनी भारतीय इंटरनेट फार्मसी असोसिएशन (आयआयपीए) ही संघटना स्थापन केली.
माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ तसेच औषधी नियमन २०१५ नुसार औषधांची विक्री केली जावी. ई-व्यापारातील कंपन्यांचा प्रसार आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी नियमांचे पालन केले जावे, असे या संघटनेने निवेदनात स्पष्ट केले.
>>आॅनलाइन औषध विक्रीबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. औषध विक्रेत्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी उपसमिती स्थापन केली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले.
>>24 तासांच्या संपाची सर्वसामान्य रुग्णांना मोठी झळ बसली. केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या औषध दुकानांमध्ये औषध खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसून आली.

Web Title: Drug sales stopped nationwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.