ड्रग्ज तस्कर, गँगस्टर रडारवर; ६ राज्यांत १५० ठिकाणी धाडी; दहशतवाद्यांशी संबंध, एनआयएची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 06:31 AM2023-05-18T06:31:32+5:302023-05-18T06:32:12+5:30

देशातील अनेक राज्यांतही त्यांचे नेटवर्क असल्याची माहितीही समोर आली होती. या प्रकरणात एनआयएने १९ जणांना अटक केली आहे.

Drug traffickers, gangsters on the radar; Raid at 150 locations in 6 states; Links with terrorists, NIA action | ड्रग्ज तस्कर, गँगस्टर रडारवर; ६ राज्यांत १५० ठिकाणी धाडी; दहशतवाद्यांशी संबंध, एनआयएची कारवाई

ड्रग्ज तस्कर, गँगस्टर रडारवर; ६ राज्यांत १५० ठिकाणी धाडी; दहशतवाद्यांशी संबंध, एनआयएची कारवाई

googlenewsNext

भोपाळ : अमली पदार्थ तस्कर, दहशतवादी आणि गँगस्टर यांच्यातील संबंधांच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी सहा राज्यांतील सुमारे १५० पेक्षा अधिक ठिकाणांवर धाडी टाकल्या. याप्रकरणी एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली आहे. 

उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांत एनआयएने छापेमारी केली. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात धाडीनंतर जितेंदरसिंग नावाच्या एका व्यक्तीला पकडण्यात आले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील सेंधवा येथेही धाडी टाकण्यात आल्या. (वृत्तसंस्था) 

मोबाइल ताब्यात घेऊन घरी सोडले
- मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, आरोपी जितेंदरसिंग याच्या खात्यावरील पैशांसंबंधी त्याची चौकशी करण्यात आली. 
- फिलिपिन्समधील त्याचा भाऊ त्याच्या खात्यावर नियमित पैसे जमा करतो. एका व्यवहारात त्याने तिसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर घाईघाईने ५० हजार जमा केल्याचे आढळून आले आहे. त्याचा मोबाइल फोन ताब्यात घेऊन त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सेंधवामध्ये एनआयएच्या पथकाने शिकलकरी समाजाचे सदस्य राहत असलेल्या एका ठिकाणी छापा मारला. या लोकांवर बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचे उत्पादन आणि पुरवठ्याचा आरोप आहे. 

वर्षभरापूर्वीच लावला होता छडा 
- सूत्रांनी सांगितले की, याप्रकरणी एनआयएने गेल्या वर्षी गुन्हे नोंदवले होते. विदेशातील काही गुन्हेगारी टोळ्या उत्तर भारतात हत्या आणि हिंसाचार घडविण्यासाठी काम करीत असल्याच्या माहितीवरून हे गुन्हे नोंदविण्यात आले होते. 
- दहशतवादी, गँगस्टर आणि अमली पदार्थ तस्कर एकत्रितरीत्या काम करून दहशतवादी कारवायांसाठी शस्त्रास्त्र तस्करी करीत असल्याची माहितीही एनआयएला मिळाली होती. 
- देशातील अनेक राज्यांतही त्यांचे नेटवर्क असल्याची माहितीही समोर आली होती. या प्रकरणात एनआयएने १९ जणांना अटक केली आहे.
 

Web Title: Drug traffickers, gangsters on the radar; Raid at 150 locations in 6 states; Links with terrorists, NIA action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.