कोरोना लसीसंदर्भात DCGI मोठी घोषणा करण्याची शक्यता, बोलावली पत्रकार परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 08:58 AM2021-01-03T08:58:08+5:302021-01-03T09:07:34+5:30
DCGI : डीसीजीआयने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे.
नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरूवातीसोबत देश लवकरच कोरोनामुक्त होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहेत. भारतात कोविशिल्ड आणि कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता नवीन वर्षाच्या तिसर्या दिवशी कोरोना लसीबद्दल मोठी घोषणा केली जाऊ शकते. कोरोना लसीसंदर्भात ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआय आज मोठी घोषणा करू शकते, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. यासाठी डीसीजीआयने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे.
सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या कोरोनावरच्या तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती. अखेर त्याला मान्यता देण्यात आली आहे. तसेच, यापूर्वी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या तज्ज्ञ समितीने सीरम संस्थेच्या कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती. या दोन्ही लसी अंतिम मंजुरीसाठी देशाच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल अर्थात डीसीजीआय व्हीजी सोमानी यांच्याकडे पाठवण्यात आली होती.
Drugs Controller General of India (DCGI) to brief media on #COVID19vaccine tomorrow at 11 am #IndiaFightsCorona#Unite2FightCorona#MaskUpIndiapic.twitter.com/rJXZDXoW2s
— DD News (@DDNewslive) January 2, 2021
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेली आणि अॅस्ट्रॅजेनेका या औषधी कंपनीने तयार केलेली ही लस पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने कोविशिल्ड म्हणून विकसित केली आहे. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन नावाची एक स्वदेशी कोविड लस तयार केली आहे.
देशातील सर्वांना कोरोना लस मोफत देणार; आरोग्य कर्मचाऱ्यांना असेल प्राधान्य
देशातील सर्वांना कोरोना लस मोफत देणार, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी जाहीर केले. आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्ध्यांना सर्वात आधी ही लस दिली जाईल, असेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी आरोग्यसेवक व २ कोटी कोरोना योद्धे यांना लस मोफत दिली जाईल, अन्य २७ कोटी लोकांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यात डॉक्टरांसहित आरोग्यसेवक, कोरोना योद्धे, तसेच ज्येष्ठ नागरिक आदींचा समावेश आहे.