संतापजनक! नशेत तर्र पोलीस आणि होमगार्डमध्ये पैसे वाटपावरून हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 11:25 AM2022-09-06T11:25:22+5:302022-09-06T11:31:43+5:30
पोलीस आणि होमगार्ड एकमेकांना भिडले, एकमेकांच्या जीवावरच उठल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पैशांचं योग्य वाटप झाल्याने दोघांमध्ये वाद झाला, पुढे तो वाद टोकाला गेला.
उत्तर प्रदेशच्या जालौनमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. पोलीस आणि होमगार्ड एकमेकांना भिडले, एकमेकांच्या जीवावरच उठल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पैशांचं योग्य वाटप न झाल्याने दोघांमध्ये वाद झाला, पुढे तो वाद टोकाला गेला आणि त्यांनी एकमेकांना थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अनेकांनी यावर टीकेची झोड उठवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या जालौनमधील रामपुरा परिसरात हाणामारीची ही घटना घडली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी असलेला हेल्पलाईन नंबर 100 वर तैनात असलेले पोलीस आणि होमगार्डमध्ये पैशावरून वाद झाला. त्यानंतर दोघांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दोघेही दारुच्या नशेत गाडीतून ड्युटीवर जात होते. याच दरम्यान पैसे वाटण्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
मला कमी पैसे मिळाले, असा त्या दोघांचा दावा होता. त्यातूनच पुढे दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. गाडीत उपस्थित असलेल्या इतर पोलिसांनी मध्यस्थी केले आणि दोघांना वेगळे केले. मात्र हाणामारीचा व्हिडीओ काही लोकांनी काढला आणि आता तो व्हायरल होत आहे. मारामारीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि होमगार्ड दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
होमगार्डने दिलेल्या माहितीनुसार, वसुलीदरम्यान तो कॉन्स्टेबलसोबत होता. मात्र पैसे मागितले असता त्या पोलिसाने शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी जालौनच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, पोलीस आणि होमगार्डमधील मारहाणीची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे.
सीओ मधौगढ यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. पोलिसाला निलंबित केले आहे, तर होमगार्डला पुन्हा होमगार्ड कार्यालयात पाठवण्यात आले आहे. तसेच होमगार्ड कमांडंटला पत्र लिहून होमगार्डवर कारवाई करण्यास सांगितले आहे. असा उद्धटपणा आणि गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशी सक्त ताकीद दोघांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.