लोकसभा अध्यक्षांचा रेल्वे प्रवास अन् शेजारील कोचमध्ये दारूड्यांचा गोंधळ, पुढं काय घडलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 05:28 PM2019-09-10T17:28:40+5:302019-09-10T17:28:56+5:30
अध्यक्ष ओम बिर्ला यांना तरुणांच्या या कृत्याचा त्रास होऊ लागल्याने आणि रेल्वेतील इतर प्रवाशांनाही त्रास होऊ लागल्याने बिर्ला यांनी आपले सहायक राघवेंद्र यांना या तरुणांची समजूत काढण्यास पाठवले.
नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना रेल्वे प्रवासात दारुड्यांचा त्रास सहन करावा लागला. ओम बिर्ला हे रविवारी रात्री 12416 इंदौर इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास करत होते. या रेल्वेच्या फर्स्ट क्लास बोगीतून ते दिल्लीतून कोटा येथे जात होते. त्यावेळी, रात्री 11 वाजण्याचा सुमारास रेल्वेने निजामुद्दीन स्टेशन सोडताच, त्यांच्या शेजारील कोचमध्ये दिल्ली आणि गुरुग्राम येथील 5 तरुण बसले होते. या तरुणांनी रेल्वेतच दारू पिऊन गोंधळ घालायला सुरूवात केली.
अध्यक्ष ओम बिर्ला यांना तरुणांच्या या कृत्याचा त्रास होऊ लागल्याने आणि रेल्वेतील इतर प्रवाशांनाही त्रास होऊ लागल्याने बिर्ला यांनी आपले सहायक राघवेंद्र यांना या तरुणांची समजूत काढण्यास पाठवले. मात्र, राघवेंद्र यांना गंभीरतेनं न घेता, या तरुणांनी राघवेंद्र यांच्याशीच हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, बिर्ला यांच्या आदेशानुसार राघवेंद्र यांनी रेल्वे नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर, काही वेळातच रेल्वे मथुरा स्टेशनवर पोहोचताच रेल्वे सुरक्षा दलाची फौजच रेल्वे स्थानकावर जमा झाली. या दलाने रेल्वेतील पाचही दारुड्या तरुणांना अटक केली. त्यावेळी, रेल्वे सुरक्षा दलाने या तरुणांच्या बोगीतील सिटवरुन दारुच्या बाटल्या, चकना आणि कोल्ड्रींक्सच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत, आरपीएफ पोलीस ठाण्याचे प्रभारी सीबी प्रसाद म्हणाले की, अटक करण्यात आलेल्या तरुणांमध्ये दिल्लीचे विकास डागर आणि राजीव (दोघेही वय वर्षे 36), छावला येथील मनोज, गुरूग्राम काकडोला येथील अमरप्रीत (40) आणि हाजीपूर येथील प्रितम (42) या युवकांचा समावेश आहे. रेल्वे दारू पिऊन गोंधळ घातल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांची कोठडीत रवानगी केल्याचंही प्रसाद यांनी सांगितलं.