दारूबंदी, तरी बिहारमध्ये डॉक्टरांची दारूपार्टी; रुग्णालयाच्या गेस्ट हाउसमधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 06:08 AM2023-12-18T06:08:03+5:302023-12-18T06:08:14+5:30
- एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्क पाटणा : बिहारच्या दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या गेस्ट हाउसमध्ये दारू पार्टी ...
- एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बिहारच्या दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या गेस्ट हाउसमध्ये दारू पार्टी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. एका कॉन्फरन्ससाठी शहर व इतर ठिकाणांहून आलेल्या डॉक्टरांनी ही पार्टी केल्याचे उघड झाले आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या संदर्भात दरभंगा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य के. एन. मिश्रा यांना विचारले असता, त्यांनी अशा प्रकारची पार्टी झाल्याचा इन्कार केला. व्हिडीओ करणाऱ्याने खोक्यातून दारूच्या बाटल्या काढल्याचे स्पष्ट दिसते. याचा अर्थ तोपर्यंत त्या बाटल्या खोक्यातच होत्या, असे त्यांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची दरभंगाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अवकाश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे.
विदेशी दारूच्या
तीन बाटल्या जप्त
या प्रकरणात पुढील कारवाई करण्याची जबाबदारी त्यांनी एसडीपीओ अमितकुमार यांच्याकडे सोपवली आहे. त्यांनी तातडीने गेस्ट हाउस व रेस्टॉरंटमध्ये जाऊन झडती घेतली. यावेळी गेस्ट हाउसच्या १०२ क्रमांकाच्या खोलीमध्ये विदेशी दारूच्या तीन बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या तिन्ही बाटल्या महागड्या असल्याचे सांगितले जाते. या प्रकारानंतर पोलिसांनी प्रत्येक खोलीची झडती घेतली. त्याचबरोबर दारू पार्टीत सामील असलेल्या डॉक्टरांचाही शोध घेतला जात आहे.
राजकारण तापले
डॉक्टरांच्या दारू पार्टीचा व्हिडीओ पुढे आल्यानंतर बिहारमध्ये राजकारण तापले आहे.
भाजप व हम पक्षाने दारू पार्टीवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद यांनी म्हटले आहे की, बिहारचे पोलिस दारू विक्रीचे काम करवून घेत आहेत.
जापचे प्रमुख पप्पू यादव यांनी म्हटले आहे की, या प्रकाराने बिहारमधील दारूबंदीची पोलखोल झाली आहे. राज्यात गरिबांसाठी व डीएमसीएचचे प्राचार्य व डॉक्टरांसाठी दारूबंदीचा वेगळा कायदा आहे का? हे डॉक्टर दारू पार्टी करीत असताना प्रशासन झोपले होते का? मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याची दखल घ्यावी.