ड्राय फ्रूट्स खाणारा ‘गोलू-2’, किंमत 10 कोटी; वर्षाला कमावतो 25 लाख; त्याच्या बछड्यांची संख्या जाणून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 05:48 PM2023-12-21T17:48:24+5:302023-12-21T17:49:15+5:30
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित नरेंद्र सिंह हे आपल्या गोलू-2 ला घोलू नावाने बोलावतात.
बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथील व्हेटरनरी कॉलेज ग्राउंडमध्ये सध्या मुर्रा जातीचा रेडा (Male Buffalo) गोलू-2 ला बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. हरियाणातील शेतकरी नरेंद्र सिंह हे गोलू-2 ला घेऊन मंगळवारी पाटण्यात पोहोचले. ते 23 डिसेंबरपर्यंत पाटण्यात राहणार आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित नरेंद्र सिंह हे आपल्या गोलू-2 ला घोलू नावाने बोलावतात.
गोलू-2 ची किंमत अंदाजे 10 कोटी रुपये एवढी आहे. नरेंद्र सिंह सांगतात, या सहा वर्षांच्या गोलू-2 हा त्यांच्या घरातील तिसऱ्या पिढीतील आहे. त्याचे अजोबा पहिली पिढी होते. त्याचे नाव गोलू होते. त्याचा बछडा बीसी 448-1 ला गोलू-1 म्हणू शकता आणि आता हा गोलूचा नातू आहे. एवढेच नाही, तर गोलू-2 चे सीमेन विकूण आपण दर वर्षाला जवळपास 25 लाख रुपये कमावतो, असेही नरेंद्र सिंह सांगतात. गोलू-2 ला नरेंद्र सिंह यांचे हावभाव चटकन समजतात.
गोलू-2 ला ड्राय फ्रूट्सचा खुराक! -
10 कोटी रुपयांच्या गोलू-2 ला ड्राय फ्रूट्सचा खुराकही दिला जातो. त्याचे वजन जवळपास 15 क्विंटल एवढे आहे. त्याची उंची जवळपास साडेपाच फूट तर रुंदी तीन फूट एवढी आहे. गोलू रोज जवळपास 35 किलो ग्रॅम कोरड्या आणि हिरव्या चाऱ्याशिवाय हरभरेही खातो. त्याच्या डायटमध्ये 7 ते 8 किलो ग्रॅम गुळाचाही समावेश आहे. त्याला कधी कधी तूप आणि दूधही दिले जाते. त्याच्या केवळ खाण्यावरच दर महिन्याला 30 ते 35 हजार रुपये एवढा खर्च होतो.
किती आहेत गोलू-2 चे उत्तराधिकारी? -
हरियाणाच्या पानीपत जिल्ह्यातील डिडवारी गावचे रहिवासी असलेले पशुपालक नरेंद्र सिंह यांना पशुपालन क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नरेंद्र सिंह यांनी सांगितल्यानुसार, गोलू-2 हा त्याचे वडील आणि आजोबांपेक्षाही उत्तम रेडा आहे. गोलू-2 ने आतापर्यंत जवळपास 30 हजार धष्ट-पुष्ट उत्तराधिकारी तयार केले आहेत. याच्या एका बछड्याचे नाव कोबरा ठेवण्यात आले आहे. गोलू-2 च्या सीमेनला केवळ देशभरातूनच नाही, तर परदेशातूनही मोठी मागणी आहे. मात्र, नरेंद्र सिंह हे कुठल्याही सप्लायरला नाही, तर केवळ शेतकरी पशुपालकालाच सीमेन देतात. महत्वाचे म्हणजे, या जातीच्या रेड्यांचे सरासरी वय साधारणपणे 20 वर्ष एवढे असते.